फडणवीसांच्या घरी गणपती दर्शनसाठी BJP आमदारांची गर्दी! प्रसादाबरोबर मिळाले 'हे' 5 सल्ले

Maharashtra Vidhan Sabha Election 2024: विधानसभेच्या निवडणुकीची पूर्वतयारी सर्वच पक्षांनी सुरु केलेली असताना फडणवीस यांनी गणेशोत्सवानिमित्त भाजपाच्या आमदारांना घरी आमंत्रित केलं होतं.

स्वप्निल घंगाळे | Updated: Sep 13, 2024, 06:55 AM IST
फडणवीसांच्या घरी गणपती दर्शनसाठी BJP आमदारांची गर्दी! प्रसादाबरोबर मिळाले 'हे' 5 सल्ले title=
गुरुवारी भाजपा आमदारांनी फडणवीसांच्या घरी जाऊन घेतलं बाप्पाचं दर्शन (फोटो एक्सवरुन साभार)

Maharashtra Vidhan Sabha Election 2024: राज्यातील आगामी विधानसभा निवडणुकीसाठी सर्वच पक्षांनी तयारी सुरु केली आहे. याच तयारीचा एक भाग म्हणून भारतीय जनता पार्टीच्या सर्व आमदारांना बुधवारी राज्याचे उपमुख्यमंत्री तसेच भाजपाचे महाराष्ट्रातील सर्वात मोठे नेते असलेल्या देवेंद्र फडणवीस यांनी विचारमंथनासाठी आमंत्रित केलं होतं. फडणवीस यांनी गणेशोत्सवाच्या निमित्ताने 'सागर' बंगल्यावर आमदारांना आमंत्रित केलं होतं. यावेळेस त्यांनी भाजपा आमदारांबरोबर चर्चा केली. फडणवीसांनी यावेळेस भाजपाच्या आमदारांना पाच महत्त्वाचे सल्ले दिले आहेत.

देवेंद्र फडणवीस यांनी सर्वच प्रमुख नेते, आमदार, खासदारांना गणपती दर्शनासाठी आमंत्रित केलं होतं. फडणवीस यांनी गुरुवारी सायंकाळी अनौपचारिक चर्चेसाठी भाजपा आमदारांना आमंत्रित केलं होतं. त्यानुसार अनेक आमदार 'सागर' बंगल्यावर गणपती दर्शनासाठी आले होते. यावेळेस फडणवीसांनी आमदारांबरोबर अनौपचारिक गप्पा मारल्या. बाप्पाच्या प्रसादाबरोबरच नेत्यांना फडणवीसांना निवडणुकीपूर्वीच्या तयारीचा कानमंत्र या बैठकीदरम्यान दिल्याचे समजते. 

फडणवीसांनी काय सांगितलं?

फडणवीसांनी भाजपाच्या आमदारांना राज्यात सत्तेत असलेल्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वाखालील भाजपाच्या पाठिंब्यावर स्थापन झालेल्या सरकारच्या लाडक्या बहीण योजनेसह प्रमुख योजना लोकांपर्यंत पोहोचवण्यास सांगितलं आहे. जास्तीत जास्त लोकांपर्यंत सरकार काय काम करतंय, कोणत्या योजना आणल्या आहेत याचा माहिती पोहोचवा असं फडणवीसांनी आमदारांना सुचवलं आहे.

अपशब्द टाळा

महायुतीमधील नेत्यांविरोधात अपशब्द टाळण्याचा सल्ला फडणवीसांना आमदारांना दिला. मागील काही काळापासून महायुतीमधील भाजपा, एकनाथ शिंदेंची शिवसेना आणि अजित पवारांच्या राष्ट्रावादी काँग्रेसच्या नेत्यांमध्ये शाब्दिक खटके उडत असल्याचं दिसत आहे. थेट प्रसारमाध्यमांसमोर अनेक नेत्यांनी एकमेकांच्या भूमिकांवरुन विरोध दर्शवताना केलेल्या विधानांवरुन नंतर बड्या नेत्यांना सारवासारव करण्याची वेळी आल्याचंही पाहायला मिळालं आहे. 

नक्की वाचा >> 4 लाखांच्या खऱ्या सोनसाखळीसहीत गणरायाच्या मूर्तीचं विसर्जन केलं; घरी आल्यावर...

मतदारसंघात वेळ द्या

फडणवीस यांनी विधानसभेला काही महिन्यांचा कालावधी असल्याने आमदारांनी अधिकाधिक वेळ मतदार संघात द्यावा असं सुचवलं आहे. जास्तीत जास्त लोकांमध्ये राहून आपण लोकांसाठी सतत उपलब्ध आहोत असं पाहावं अशा अर्थाचा सल्ला राज्यातील भाजपाच्या सर्वोच्च नेत्याकडून देण्यात आला आहे.

कामे तातडीने मार्गी लावा

फडणवीस यांनी विधानसभा निवडणुकीची घोषणा कधीही होऊ शकते या पार्श्वभूमीवर आचारसंहिता लागू होण्याची शक्यता लक्षात घेत सर्वच आमदारांना मतदारसंघातील अंतिम टप्प्यातील कामे तात्काळ मार्गी लावण्याचा सल्ला दिला आहे. आचारसंहिता लागू झाल्यास नव्याने कोणतीही कामे सुरु करता येत नाहीत तसेच नव्याने निधी दिला जात नाही. त्यामुळेच हा सल्ला देण्यात आल्याचे समजते.

लागेल त्या मदतीसाठी उभा आहे

फडणवीस यांनी शेवटी सर्व आमदारांना, ''लागेल त्या' मदतीसाठी मी उभा आहे', असं सांगितलं.