Weather Update : राज्यात मागील काही दिवसांपासून बहुतांश भागांमध्ये ढगाळ वातावरण पाहायला मिळालं. तर, उत्तर महाराष्ट्रात मात्र कोरड्या वातावरणासह किमान तापमानात घट नोंदवण्यात आली. हवामान विभागानं वर्तवलेल्या अंदाजानुसार येत्या काही दिवसांमध्ये महाराष्ट्रात तापमानात घट नोंदवली जाणार असून, खऱ्या अर्थानं थंडीची सुरुवात होण्यास पूरक वातावरणनिर्मिती होताना दिसत आहे. राज्याच्या बहुतांश भागांमध्ये पहाटेच्या वेळी कडाक्याची थंडी आणि धुकं पाहायला मिळू शकतं. ज्यामुळं दृश्यमानतेवर याचा परिणाम होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
तापमानाच्या आकड्यांवर नजर टाकायची झाल्यास यामध्ये सरासरी दोन ते तीन अंशांची घट नोंदवली जाऊ शकते. ज्यामुळं विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्र ही क्षेत्र सर्वाधिक प्रभावी असतील. 23 नोव्हेंबर नंतर आग्नेयेकडून येणाऱ्या बाष्पयुक्त वाऱ्यांमुळं दक्षिण महाराष्ट्रात मात्र तापमानवाढ नोंदवली जाऊ शकते. परिणामी पुढील काही दिवसांसाठी या भागांमध्ये ढगाळ वातावरण पाहायला मिळू शकतं. शिवाय पावसाच्या तुरळक सरीसुद्धा इथं नाकारता येत नाहीत.
मागील 24 तासांचा आढावा घेतला असता रविवारी राज्यात सर्वाधिक तापमानाची नोंद रत्नागिरीत करण्यात आली, तर, सर्वात कमी तापमानाची नोंद जळगावात करण्यात आली. इथं तापमानाचा आकडा अनुक्रमे 35 अंश आणि 14 अंश सेल्सिअस इतका होता.
नंदुरबार, धुळ्यातही मोठ्या फरकानं तापमानात घट नोंदवण्यात आली आहे. सातपुड्यातील तापमानही 15 अंश सेल्सिअच्या खाली गेलं. येत्या काळात तापमानात आणखी घट होण्याची असल्यामुळं आता थंडीपासून बचावासाठी ग्रामीण भागात शेकोट्यांचा आधार घेतला जातोय. या थंडीचा रब्बी पिकांना फायदाही होताना दिसतोय. शिवाय हिवाळी पर्यटनालाही वाव मिळताना दिसतोय.
तामिळनाडू आणि केरळातील बहुतांश भागांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. बंगालच्या उपसागरावरून या दिशेनं येणाऱ्या चक्राकार वाऱ्यांची एकंदर स्थिती पाहता त्यामुळं समुद्र खवळलेला असू शकतो. याच धर्तीवर पुद्दुचेरी, तामिळनाडू आणि केरळमध्ये वादळी वारे, ढगांचा गडगडाट आणि वीजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. या भागांमध्ये वादळी वारे वाहणार असल्याचीही शक्यता असल्यामुळं मच्छिमारांनाही सतर्क राहण्याचा इशारा देण्यात आला आहे.