Weather Update : मुंबईला पावसाची भेट देत, राज्याच्या 'या' दिशेला वळली शीतलहर; थंडीचा कडाका वाढणार

Weather Update : राज्यात जिथं ऐन थंडीच्या दिवसांमध्ये पावसानं हजेरी लावण्यास सुरुवात केली होती तिथंच आता पुन्हा एकदा थंडीची चाहूल लागणार आहे.   

सायली पाटील | Updated: Jan 11, 2024, 08:27 AM IST
Weather Update : मुंबईला पावसाची भेट देत, राज्याच्या 'या' दिशेला वळली शीतलहर; थंडीचा कडाका वाढणार  title=
Maharashtra weather news temprature drop down rain predictions too

Weather Update : गेल्या काही दिवसांपासून अरबी समुद्रात तयार झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळं मुंबई, कोकण आणि गोव्याच्या किनारपट्टी भागांमध्ये पावसासाठी पूरक वातावरणनिर्मिती झाल्याचं पाहायला मिळालं होतं. पण, आता मात्र मुंबई वगळता राज्याच्या उर्वरित भागांमध्ये परिस्थिती बदलणार असून थंडीची चाहूल लागणार असल्याचा इशारा हवामान विभागानं वर्तवला आहे. 

राज्यात पुन्हा वाढणार थंडीचा कडाका 

हवामान विभागाच्या माहितीनुसार आग्नेय दिशेकडून येणारे बाष्पयुक्त वारे आणि पश्चिमेकडून येणारे थंड वारे यांच्या एकत्रिकरणामुळं सध्या राज्याच्या विविध भागांत सुरु असणाऱ्या पावसाची रिमझिम काही प्रमाणात तमी होणार असून, हळुहळू ती पूर्णपणेही थांबू शकते. ज्यानंतर हवामान बहुतांशी कोरडं राहणार असून, तापमानात घट होऊन राज्यात थंडीचं प्रमाण वाढणार आहे.  

हेसुद्धा वाचा : शिंदे गट हीच खरी 'शिवसेना', 16 आमदार पात्र...ठाकरे गटाला धक्का

 

अरबी समुद्रातील कमी दाबाचा पट्टा, आग्नेयेकडून येणारे बाष्पयुक्त वारे आणि पश्चिमेच्या शीतलहरीनंतर गेल्या दोन- तीन दिवसांपासून बहुतांश राज्यामध्ये पावसानं हजेरी लावली, तर अनेक भागांवर पावसाळी ढगांचं सावट पाहायला मिळालं. गुरुवारपासून मात्र हा पाऊस माघार घेताना दिसणार असून, तापमानात थेट चार ते पाच अंशांनी घट होण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. ज्यामुळं विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्रात पुन्हा एकदा थंडीचा कडाका वाढणार आहे. 

मुंबईवर पावसाचे ढग 

मुंबईतही येत्या 24 तासांमध्ये ढगाळ वातावरण पाहायला मिळू शकतं. आग्नेय अरबी समुद्रात चक्रीय वाऱ्यांची स्थिती निर्माण झाल्यामुळं मुंबईवर पावसाचं सावट कायम राहणार आहे. शहरातील हवेत आद्रतेचं प्रमाणही अधिक राहणार असून, दमटपणामुळं उष्णतेचा दाहसुद्धा अधिक जाणवण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे.