ढगांचं सावट, धुक्याची चादर आणि झोंबणारा गारवा; राज्याच्या कोणत्या भागात असेल हवामानाचं हे चित्र?

Maharashtra Weather News : अवकाळीचं सावट असणाऱ्या महाराष्ट्रातील बहुतांश जिल्ह्यांना पावसानं बेजार केलं असतानाच आता हे संकट माघार घेताना दिसणार आहे.   

सायली पाटील | Updated: Dec 8, 2023, 07:05 AM IST
ढगांचं सावट, धुक्याची चादर आणि झोंबणारा गारवा; राज्याच्या कोणत्या भागात असेल हवामानाचं हे चित्र?  title=
maharashtra weather news winter cold wave in northern states

Maharashtra Weather News : बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या चक्रीवादळाची तीव्रता कमी होऊन या वाऱ्यांनी दिशा बदलली असली तरीही राज्याच्या काही भागांमध्ये मात्रा पावसाळी वातावरण असेल ही वस्तूस्थिती नाकारता येत नाही. हवामान विभागाच्या माहितीनुसार सध्या अवकाळीचं प्रमाण तुलनेनं कमी होणार असून, ढगाळ वातावरण मात्र कायम राहील. या बदलामुळं बहुतांश जिल्ह्यांवर धुक्याची चादर पाहायला मिळेल. ज्याचा परिणाम दृश्यमानतेवर होईल असा अंदाज हवमान विभागानं वर्तवला आहे. 

पुढील 24 तासांमध्ये राज्याच्या बहुतांश भागांमधील कमाल आणि किमान तापमानात चढ उतार होताना पाहायला मिळतील. सातारा, कोल्हापूर, पुणे, सांगली या पट्ट्यामध्ये हवेतील गारवा वाढणार आहे. तर, पहाटेच्या वेळी इथं धुक्याचं प्रमाण जास्त असणार आहे. साताऱ्याच्या डोंगराळ भागामध्ये थंडीचा कडाका वाढणार असल्याचा अंदाजही हवामान विभागानं वर्तवला आहे. 

सध्याच्या घडीला राज्यातील उच्चांकी तापमानाची नोंद रत्नागिरी येथे करण्यात आली असून इथं तापमान 34.3 अंशांवर पोहोचल्याचं पाहायला मिळालं. तर निच्चांकी तापमानाची नोंद महाबळेश्वर इथं करण्यात आली. राज्यातील गिरीस्थानांपैकी एक असणाऱ्या महाबळेश्वरमध्ये तापमान 13 अंशांवर पोहोचलं होतं. उर्वरित राज्यामध्ये हवामान कोरडं राहणार असून, आता थंडीचं प्रमाण मात्र वाढणार आहे. 

राज्यावर केव्हा आहे पावसाचं सावट? 

हवामान विभागाच्या माहितीनुसार अरबी समुद्रावरून तयार होणारा कमी दाबाचा रट्टा सध्या पश्चिमेला पुढे जात असून, तो समुद्रातच विलिन होणार आहे. ज्येष्ठ हवामान तज्ज्ञ माणिकराव खुळे यांच्या माहितीनुसार 11 डिसेंबर ते 13 डिसेंबरदरम्यान राज्यात हलक्या स्वरुपातील पावसाची शक्यता आहे. मध्य भारतापर्यंत या पावसाची ये-जा सुरु असेल. 

हेसुद्धा वाचा : 'अरे बापरे! सिंचन घोटाळा फेम अजित पवारांना..'; फडणवीसांचं पत्र वाचून संजय राऊतांचा टोला

 

देश स्तरावर हवामानाचा आढावा घ्यायचा झाल्यास सध्या हिमाचल प्रदेशातील पर्वतीय क्षेत्रांमध्ये बर्फाची चादर पाहायला मिळत आहे. तर, रोहतांग पास येथील वाहतुकीवर याचे परिणाम झाले आहेत. काश्मीरमध्येसुद्धा खोऱ्यात प्रचंड हिमवर्षाव झाल्यामुळं सध्या वाहतुकीचा खोळंबा झाला आहे.  महाराष्ट्रासह देशाच्या उत्तरेकडे असणाऱ्या या राज्यांमध्ये येणाऱ्या पर्यटकांसाठी हे हवामान अल्हाददायक ठरत आहे. तुम्हीही वीकेंडला जवळच्याच एखाद्या ठिकाणी हिवाळी सहलीसाठी जाण्याचा बेत आखण्याच्या तयारीत असाल तर, वेळ वाया घालवू नका. कारण हा वींकेंड थंडी गाजवणार!