राज्यात थंडीचा कडाका वाढणार; पण 'या' भागांना मात्र अवकाळीचा इशारा कायम

Maharashtra weather news : राज्याच्या कोणत्या भागातून अवकाळी पाऊस पाय काढण्याचच नाव घेत नाहीये? पाहा हवामान वृत्त... 

सायली पाटील | Updated: Dec 7, 2023, 08:13 AM IST
राज्यात थंडीचा कडाका वाढणार; पण 'या' भागांना मात्र अवकाळीचा इशारा कायम  title=
Maharashtra weather news Winter wave will start soon as rain will depart from state

Maharashtra weather news : 'मिचौंग' चक्रीवादळानं थैमान घातल्यानंतर आता देशातून हे वादळ मागे हटताना दिसत आहे. देशातील दाक्षिणात्य राज्यांमध्ये धुमाकूळ घालणाऱ्या या वादळाची तीव्रता कमी झाली असली तरीही त्यानंतर दिसणाऱ्या परिणामांच्या रुपात सध्या राज्यात अवकाळीची हजेरी पाहायला मिळत आहे. सध्या राज्याच्या विदर्भ आणि मध्य महाराष्ट्राला अवकाळीनं झोडपणं सुरु ठेवलेलं असताना मराठवाडाही या तडाख्यातून बचावला नाही. पण, पुढील 24 तासांमध्ये मात्र या अवकाळीचंही प्रमाण कमी होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. 

चक्रीवादळामुळं राज्यातील बहुतांश भागांवर पावसाळी ढगांचं सावट पाहायला मिळालं होतं. तर, काही भागांमध्ये पावसाची रिमझिमही सुरु होती. त्यातच उत्तरेकडून येणाऱ्या शीतलहरींची जोड असल्यामुळं राज्याच्या किमान तापमानात काही अंशांची घट नोंदवण्यात आली. दरम्यान, येत्या काळात विदर्भ वगळता सध्या राज्यात थंडीचा कडाका वाढणार असल्याचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. 

चक्रीवादळामुळं राज्याच्या गोंदिया, भंडारा भागांध्ये पावसानं हजेरी लावली तर, काही भागांमध्ये धुक्याची चादर पाहायला मिळाली. पश्चिम महाराष्ट्रातही पुढील 24 तासांमध्ये सूर्यदर्शन क्वचितच होणार असून, किमान तापमानात काही अंशांची घट नोंदवली जाण्याची शक्यता आहे. उर्वरित राज्यामध्ये मात्र हवामान कोरडं असेल असा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. 

देशातील हवामानाचा आढावा घ्यायचा झाल्यास सध्या मिचौंग चक्रीवादळाचे परिणाम दिसणं कायम राहील. स्कायमेटच्या अंदाजानुसार छत्तीसगड, ओडिशा, झारखंड, दक्षिण बिहार आणि पश्चिम बंगालमध्ये मुसळधार पावसाची हजेरी पाहायला मिळेल. 

हेसुद्धा वाचा : सावध व्हा! देवाच्या दारी भाविकांची लूट; सिद्धिविनायक मंदिरातील धक्कादायक प्रकार उघडकीस

तिथं दक्षिण भारतासह अंदमान आणि निकोबार बेट समूहालाही पावसाचा तडाखा बसू शकतो. तर, केरळ, तामिळनाडू आणि कर्नाटकच्या किनारी भागातही पावसाची शक्यता असल्यामुळं आणि समुद्रात वादळी वारे वाहत असल्यामुळं मासेमारांना खोल समुद्रात न जाण्याचा इशारा देण्यात आला आहे. देशाच्या उत्तरेकडे असणाऱ्या राज्यांमध्ये सध्या थंडीचं प्रमाण वाढत आहे. पश्चिमी झंझावातामुळं हवामानाच बदल होत असतानाही उत्तरेकडील राज्यांमध्ये मात्र दिवसागणिक थंडीचा कडाका वाढत आहे. काश्मीरच्या खोऱ्यात जोरदार बर्फवृष्टी सुरु असल्यामुळं याचा परिणाम वाहतुकीवर झाला आहे. तर, मनालीसह हिमाचलच्या पर्वतीय भागांमधील शीतलहरींचा थेट परिमाम मैदानी क्षेत्रांमध्ये दिसू शकतो अशी शक्यता आहे.