होळीनंतर राज्यात कडक उन्हाळा; पुढचे 2 दिवस काळजीचे, हवामान विभागाचा इशारा

Maharashtra Weather Update: महाराष्ट्रात होळीनंतर तापमानात वाढ होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. 

मानसी क्षीरसागर | Updated: Mar 24, 2024, 08:56 AM IST
होळीनंतर राज्यात कडक उन्हाळा; पुढचे 2 दिवस काळजीचे, हवामान विभागाचा इशारा title=
Maharashtra Weather Update imd forecasts Temperature Surge in coming days

Maharashtra Weather Update: राज्यात उन्हाचा कडाका वाढू लागला आहे. महाराष्ट्रातील काही ठिकाणी अवकाळी पावसाचा तडाखा बसला आहे पण राज्यातील उर्वरित भागात 39 अंशावर गेल्याने उकाडा वाढला आहे. होळीनंतर तापमानात आणखी वाढ होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. 

गेल्या काही दिवसांपासून राज्यात पहाटेच्या वेळीस गारवा जाणवतो. मात्र सकाळी 10 नंतर उकाड्यात वाढ होताना दिसत आहे. येत्या काही दिवसांत उन्हाचा कडाका आणखी वाढणार आहे. महाराष्ट्र, छत्तीसगढ आणि बिहार या तीन राज्यांत मार्च महिन्यातील तापमान वाढ थेट 40 अंशावर सेल्सियसवर नोंदवण्यात आली आहे. 

एकीकडे होळी साजरी करण्याची लगबग सुरू असताना महाराष्ट्रात व इतर राज्यात उष्मा वाढणार आहे. यंदाच्या होळीवर उष्णतेचा दाह जाणवेल, असा इशारा हवामान विभागाने दिला आहे. कोरड्या हवामानामुळं कमाल तापमानात वाढ होण्याचा अंदाज,  हवामान विभागाने वर्तवला आहे. तामिळनाडू ते विदर्भापर्यंत द्रोणीय स्थिती कायम आहे. त्याचा प्रभाव कमी होत चालला आहे. त्यामुळं उकाडा वाढला आहे. कमाल तापमानातही वाढ होत आहे. 

कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भात कोरडे हवामान आहे. त्यात दक्षिण भारताकडून राज्याकडे उष्ण वारे वाहत आहेत. त्यामुळं कडाक्याचे उन वाढू लागले आहे. सकाळी 10 वाजल्यापासूनच कडक उन्हाळा जाणवू लागला आहे. हवामान विभागाच्या माहितीनुसार, 27 मार्चपर्यंत मुंबई, पुणे आणि विदर्भासह राज्यातील अनेक भागात उन्हाची काहिली जाणवणार आहे.

यंदाचा उन्हाचा कडाका वाढणार आहे. दरवर्षी एप्रिल-मेमध्ये जाणवणाऱ्या उन्हाच्या झळा यंदा मार्च महिन्यातच जाणवू लागला आहे. तापमानातील वाढ 1970 सालापासून सातत्याने होत असल्याची नोंद आहे. 1970 ते 2024 या वर्षात एकदाही तापमानवाढीत घसरण झालेली नाहीये. यंदाच्या मार्चमहिन्यात हिच स्थिती दिसून येते. होळी सरल्यानंतर उन्हाचा कडाका अधिक जाणवणार आहे, असं इशारा देण्यात येत आहे. 

मालेगावमध्ये सूर्यनारायण कोपला

राज्यात सर्वाधिक कमाल तापमानाची नोंद 40.8°c नाशिक जिल्ह्यातील मालेगावात झाली आहे नाशिक शहराचे कमाल तापमान 36.9° तर किमान तापमान 18.6 अंश नोंदवले गेले मात्र या जिल्ह्यातील मालेगाव मात्र आत्तापासूनच चाळीशी ओलांडत विक्रमी तापमानाकडे आगे कूच करत आहे

उन्हाळ्याची चाहूल लागताच नाशिक मालेगाव सुर्यनारायाणाने आग ओकायला सुरवात केली असून मार्च महिन्यात तापामानाने चाळीशी पार केली. मालेगावमध्ये काल 40.6 अंश इतक्या उच्चांकी तापामानाची नोंद करण्यात आली.वाढत्या तापमानामुळे दुपारीच रस्ते ओस पडू लागलेले आहे. वाढलेल्या तापमानामुळे नागरिक थंडपेयाचा आसरा घेतांना दिसत आहे.