Maharashtra Weather Update: महाराष्ट्रात पावसाने जोर धरला आहे. राज्यातील विविध जिल्ह्यांत मुसळधार पाऊस बरसत आहे. काही जिल्ह्यात तर अतिवृष्टीसदृष्य पाऊस झाल्याने नदी-नाले दुधडी भरुन वाहत आहेत. मुंबईसह किनारपट्टी, पश्चिम घाटाचा परिसर आणि मध्य महाराष्ट्रातील काही ठिकाणी संततधार कायम असून पुढील तीन दिवस मध्यम ते मुसळधारेचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.
राज्यातील विविध भागांत मुसळधार पाऊस बरसत आहे. धरणक्षेत्रातही चांगला पाऊस झाल्याने तलाव अर्धे भरले आहेत. तर, मुंबईतही पावसाने जोर धरला आहे. गेल्या तीन दिवसांपासून मुंबईत मुसळधार पाऊस होत आहे. त्यामुळं सखल भागांत पाणीदेखील साचले होते. रत्नागिरी, कोल्हापूर, सांगली जिल्ह्यातही पावसाने हाहाकार माजला आहे. पंचगंगा, जगबुडी, सावित्री नद्यांनी इशारा पातळी गाठली होती. सोमवारी, मुंबई, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, ठाणे, सातारा येथील घाटमाथ्यावर जोरदार पाऊस झाला. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, आजही पावसाचा इशारा देण्यात आला आहे.
मुंबईसह कोकणात पुढील 2 ते 3 दिवस मुसळधार पाऊस बरसणार आहे. त्याशिवाय राज्यातील अनेक भागांत जोरदार पाऊस होणार आहे. पश्चिम, उत्तर महाराष्ट्रातही पावसाचा इशारा देण्यात आला आहे. पुढील तीन दिवस मध्यम ते मुसळधारेचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. उत्तर छत्तीसगड व लगतच्या भागावर असलेले कमी दाबाचे क्षेत्र आता पूर्व मध्य प्रदेश आणि छत्तीसगडवर सक्रिय आहे. त्यामुळे विदर्भातील पावसाचा जोर कमी झाला आहे.
समुद्रसपाटीवरील गुजरातपासून केरळपर्यंत कमी दाबाचा पट्टी सक्रिय आहे. त्यामुळे अरबी समुद्रातून येणाऱ्या बाष्पयुक्त वाऱ्याचा जोर कायम आहे. त्यामुळे किनारपट्टी, घाट परिसरात आणि मध्य महाराष्ट्रातील काही ठिकाणी पावसाचा जोर कायम आहे. मुंबईसह किनारपट्टी, पश्चिम घाटाचा परिसर आणि मध्य महाराष्ट्रातील काही ठिकाणी संततधार कायम असून पुढील तीन दिवस मध्यम ते मुसळधारेचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.
रेड अलर्ट – रत्नागिरी, सातारा
ऑरेंज अलर्ट – सिंधुदुर्ग, कोल्हापूर, रायगड, पुणे
यलो अलर्ट – मुंबई, ठाणे, पालघर, नाशिक, धुळे, नंदूरबार आणि विदर्भ