Weather Update : पाऊस पाठ सोडेना! राज्यातील 'या' भागांना यलो अलर्ट

Weather Update : देशभरात सध्या हवामानाची विविध रुपं पाहायला मिळत आहेत. यामध्ये महाराष्ट्रात हवामानानं बळीराजाची चिंता वाढवली असल्याचं पाहायला मिळत आहे.   

सायली पाटील | Updated: Nov 28, 2023, 07:33 AM IST
Weather Update : पाऊस पाठ सोडेना! राज्यातील 'या' भागांना यलो अलर्ट title=
maharashtra weather update rain predictions in vidarbha konkan latest news in marathi

Weather Update : मान्सूननं राज्यातून परतीची वाट धरलेली असली तरीही अद्याप पावसानं मात्र महाराष्ट्राला रामराम ठोकलेला नाही. उलटपक्षी अवकाळीनं जोर धरल्यामुळं आता राज्यातील शेतकरी हवालदिल झाला आहे. भरीस आलेल्या पिकांचं मोठं नुकसान झाल्यामुळं आता या संकटातून सावरण्याचेच प्रयत्न शेतकरी करताना दिसत आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार राज्यातील हे अवकाळीचं वातावरण आणखी काही दिवसांसाठी कायम राहणार आहे. 

पुढील 24 तासांसाठी मराठवाडा, मध्य महाराष्ट्र आणि विदर्भासह कोकणातील काही जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. या भागांमध्ये ढगांच्या गडगडाटासह पावसाची शक्यताही वर्तवण्यात आली असून, याच धर्तीवर यलो अलर्टही देण्यात आला आहे. काही भागांमध्ये वीजा आणि सोसाट्याच्या वाऱ्यासह पावसाचा अंदाज आहे. सध्याच्या घडीला अरबी समुद्राच्या नैऋत्येपासून चक्राकार वाऱ्यांची स्थिती निर्माण झाल्यामुळं हवेचा कमी दाबाचा पट्टा निर्माण होताना दिसत आहे. ज्यामुळं अवकाळी इतक्यात पाठ सोडणार नसल्याचं चित्र सध्या पाहायला मिळत आहे.

कोणकोणत्या भागांना पावसाचा यलो अलर्ट? 

राज्यात सध्या मान्सूननं माघार घेतली असली तरीही अवकाळीनं थैमान घालणं सुरु ठेवलं आहे. ज्यामुळं जालना, बीड, धाराशिव, लातूर, परभणी, हिंगोली, नांदेड आणि विदर्भातील अकोला, अमरावती, नागपूर, गोंदियामध्ये यलो अलर्ट देण्यात आला आहे. पावसाच्या या स्थितीमुळं राज्यातील तापमानामध्येसुद्धा चढ- उतार पाहायला मिळणार आहेत.

हेसुद्धा वाचा : Maharastra Politics : कुणबी नोंदीवरून संघर्षाची नांदी! शिंदे समिती बरखास्त की भुजबळ राजीनामा देणार?

 

ज्येष्ठ हवामान तज्ज्ञ के.एस. होसाळीकर यांनी ट्विट करत दिलेल्या माहितीनुसार 1 डिसेंबर दरम्यान बंगालच्या उपसागरामध्ये चक्रीवादळ निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यामुळं येत्या काळात हवमानामध्ये मोठे बदल होण्याचीसुद्धा शक्यता आहे. 

एकिकडे देशाच्या दक्षिणेकडील राज्यांपासून मध्य भारतातील राज्यांमध्येही पावसाचं वातावरण असतानाच उत्तरेकडे मात्र थंडीची लाट येण्यास सुरुवात झाली आहे. काश्मीर, हिमाचल प्रदेश, उत्तराखंडचा पर्वतीय भाग इथं थंडीचा कडाका वाढत असून, डोंगराळ भागांवरून वाहत येणाऱ्या थंड वाऱ्यांमुळं मैदानी क्षेत्रांवरील तापमानातही घट पाहायला मिळत आहे.