महत्त्वाचे मुद्दे
Maharashtra Weather Updates : विदर्भ, मराठवाड्यात अवकाळीची हजेरी आणि त्यानंतर पुण्यामधील ढगाळ वातावरणानंतर आता राज्यात पुन्हा एकदा उष्णता वाढण्यास सुरुवात होणार आहे. पुढील 24 तासांमध्ये राज्यात उकाडा वाढणार असून मुंबई, ठाणे, पालघरसह कोकण किनारपट्टी भागावर याचे थेट परिणाम दिसून येणार आहेत. समुद्रातून येणाऱ्या उष्ण वाऱ्यांमुळं किनारपट्टी भागाला उन्हाच्या सर्वाधिक झळा सोसाव्या लागणार आहेत.
दरम्यान राज्यात बुधवारपर्यंत वाशिम येथे उच्चांकी तापमानाची नोंद करण्यात आली. इथं तापमानाचा आकडा 38.6 अंश इतका नोंदवण्यात आला. पुढील 24 तासांमध्ये येथील तापमान स्थिर राहण्याची शक्यता नोंदवण्यात आली आहरे. दरम्यान, विदर्भ पट्टामध्ये काही भागांत अवकाळीनं उघडीप दिली असली तरीही उन्हाचा दाह मात्र पाठ सोडताना दिसणार नाही हे निश्चित.
कमी दाबाच्या पट्ट्यामुळं राज्यातील हवामानावर परिणाम
विदर्भाच्या पश्चिम भाहगावर सध्या चक्राकार वाऱ्यांची निर्मिती होत असून त्याचे परिणाम तेलंगणापर्यंत दिसत आहेत. देशात सध्या मध्य प्रदेशपासून आसामपर्यंचत आणि दक्षिणेकडे केरळपर्यंत कमी दाबाचा पट्टा सक्रिय आहे. ज्यामुळं या भागांमध्ये अंशत: ढगाळ वातावरण पाहायला मिळू शकतं.
विदर्भावरून अद्याप अवकाळीच संकट टळलेलं नाही. पुढील दोन दिवसांमध्ये कमीजास्त प्रमाणात इथं वादळी वाऱ्यासह पावसाची हजेरी किंवा गारपीटीची शक्यता वर्तवण्यात आली आहे. वर्धा, नागपूर, गोंदिया आणि गडचिरोली भाग यामुळं प्रभावित होऊ शकतात. उत्तर महाराष्ट्रात मात्र हवामान कोरडं राहणार असून, कमाल आणि किमान तापमानाच मोठ्या फरकानं चढ- उतार अपेक्षित आहेत. पुढील चार दिवस कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्रात हवामान कोरडं राहणार असून, काही भागांमध्ये कमाल तापमानाच वाढ होण्याची शक्यता आहे. तर, पुणे आणि लगतच्या भागांमध्ये आकाश अंशत: ढगाळ राहू शकतं असा अंदाज पुणे वेधशाळेनं वर्तवला आहे.
देश स्तरावरील हवामानाचा आढावा घ्यायचा झाल्यास Skymet या खासगी हवामानसंस्थेच्या माहितीनुसार सब हिमालन पश्चिम बंगाल, पश्चिम आसाम आणि सिक्किममध्ये मुसळधार पावसाची शक्यता आहे. तर, ओडिशाचा किनारपट्टी भाग, झारखंड आणि आंध्र प्रदेशच्या उत्तर किनारपट्टी भागावर पावसाच्या तुरळक सरींचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. हिमालयाच्या पर्वतरागांमध्ये तुरळक बर्फवृष्टीचीही शक्यता आहे. पुढील 2 दिवसांसाठी इथं हिमवृष्टी कायम राहण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे.