Maharashtra Weather Update : यंदाच्या वर्षी अपेक्षित पाऊस झाला नाही, असं म्हणण्याची वेळ मान्सूननंतर आली होती. ज्यानंतर आता हिवाळा सुरु होऊ साधारण दोन महिने उलटले असले तरीही राज्यातील काही भाग वगळता उर्वरित जिल्ह्यांमध्ये तामानात समाधानकारत घट झालेली नाही. उलटपक्षी पश्चिम आणि मध्य महाराष्ट्रासह विदर्भातही पावसाची हजेरी पाहायला मिळत आहे. त्यामुळं हवामानाविषयी आता काहीत शाश्वती नसल्यानं बळीराजाही चिंतेत आला आहे.
गेल्या काही दिवसांपूर्वी राज्यात थंडीचा कडाका वाढण्यास सुरुवात झाली. निफाड, पाचगणीमध्ये तापमानाचा आकडा बराच खाली गेला खरा. पण, ही थंडी फार काळ टीकली नाही. अरबी समुद्रावर तयार झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळं आणि बाष्पुक्त वाऱ्यांमुळं राज्यावर पावसाचे ढग घोंगावू लागले आहेत. पुढील 24 तास आणि त्यानंतर येणाऱ्या शनिवारीसुद्धा महाराष्ट्रात पावसाच्या हलक्या सरींची शक्यता हवमान विभागाकडून वर्तवण्यात आली आहे.
Skymet या खासगी हवामान संस्थेनं वर्तवलेल्या अंदाजानुसार राज्याच्या कोकण, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रामध्ये पावसाची हजेरी असेल. पावसाच्या सरींमुळं या भागातील जिल्ह्यांमध्ये हवेत समाधानकारक गारवा जाणवू लागेल. तर, काही भागांमध्ये मात्र फक्त ढगांची दाटी होणार असून, हवेतील आर्द्रता वाढणार आहे.
फक्त महाराष्टातच नव्हे, तर देशातील अनेक राज्यांमध्येसुद्धा पावसाची हजेरी पाहायला मिळणार आहे. यामध्ये उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, राजस्थान आणि अरुणाचल प्रदेशचा समावेश आहे. पंजाब, हरियाणा, हिमाचल प्रदेश, उत्तराखंड , ओडिशा , बिहार, मेघालय या भागांमध्ये दाट धुक्याची चादर पाहायला मिळणार आहे. तर, काश्मीरच्या खोऱ्यात थंडीचा कडाका वाढणार असून, बर्फवृष्टीची शक्यता मात्र कमीच आहे. त्यामुळं गुलमर्ग येथील ओसाड पडलेल्या मैदानांचं चित्र पालटणार नाही.