Anil Deshmukh Thanks to Fadnavis : माजी गृहमंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गटाचे नेते अनिल देशमुख यांच्यावर सीबीआयने आणखी एक गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणात त्यांनी स्वत: ट्विट करत माहिती दिली. आपल्या ट्विटमध्ये या संदर्भात भाष्य करताना, दाखल केलेला गुन्हा तथ्यहीन असून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पायाखालची वाळू घसरल्यानं हे कटकारस्थान सुरू झाल्याचा आरोप त्यांनी फडणवीसांवर केला आहे. भाजप नेते गिरीश महाजन यांना खोट्या गुन्ह्यात अडवण्यात आल्याचा आरोप करत हा गुन्हा दाखल झालाय.
धन्यवाद... देवेंद्रजी फडणवीस, माझ्यावर CBI कडून आणखी एक तथ्यहीन गुन्हा दाखल केला गेला आहे. जनतेचा कौल बघून फडणवीसांच्या पायाखालची वाळू घसरल्याने हे कटकारस्थान सुरू झाले आहे. या अशा धमक्यांना आणि दबावाला मी अजिबात भीक घालत नाही. न झुकता - न डगमगता मी भाजपच्या या दडपशाही विरुद्ध लढण्याची खूनगाठ बांधली आहे, असं अनिल देशमुख यांनी म्हटलं आहे.
महाराष्ट्रात फडणवीसांकडून किती खालच्या पातळीचे आणि विकृत मानसिकतेचे घाणेरडे राजकारण सुरू आहे ते जनतेने बघावं. लोकसभा निवडणुकीत या कारस्थानी नेतृत्वाला जनतेने जागा दाखवून दिली आहे, आता महाराष्ट्राची जनता विधानसभा निवडणुकीची वाट बघत आहे, असं म्हणत अनिल देशमुख यांनी टीका केली आहे.
दरम्यान, मंत्री गिरीश महाजन यांनी पत्रकार परिषदेत महाविकास आघाडी सरकार असताना त्यांना मोक्का अंतर्गत अटक करण्यासाठी अनिल देशमुख यांनी खोटा गुन्हा दाखल करण्याचा प्रयत्न केला होता असा गंभीर आरोप केला होता. नुकतच सीबीआयकडून चौकशी करण्यात आली असून आता अनिल देशमुख यांचे विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यामुळे आता अनिल देशमुख यांच्या अडचणी वाढणार का? असा सवाल विचारला जात आहे.