लोकसभेतील विजय कुठल्या 'सेनापती'मुळे नाही तर... रोहित पवारांचा निशाणा कोणावर?

Maharastra Politics : अहमदनगरमध्ये झालेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या 25 व्या वर्धापनदिनी शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांना टोला (Rohit Pawar On Jayant Patil) लगावल्याची चर्चा आहे. सेनापती या शब्दावरून श्रेयवादाची लढाई सुरू झालीये की काय? असा प्रश्न विचारला जातोय.

सौरभ तळेकर | Updated: Jun 11, 2024, 03:16 PM IST
लोकसभेतील विजय कुठल्या 'सेनापती'मुळे नाही तर... रोहित पवारांचा निशाणा कोणावर? title=
Maharastra Politics Rohit Pawar On Jayant Patil

Rohit Pawar on Jayant Patil: लोकसभा निवडणूक निकालांमध्ये शरद पवार यांच्या राष्ट्रवादीनं 10 जागांवर निवडणूक लढवली होती, त्यापैकी 8 खासदार निवडून आले आहेत. त्यामुळे 80 टक्के स्ट्राईक रेटसह आम्ही जिंकलोय, असं राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी म्हटलं होतं. सांगलीत राष्ट्रवादीच्या वर्धापन दिनाच्या जाहिरातीत जयंत पाटील (Jayant Patil) यांचा 'विजयाचा सेनापती' असा उल्लेख करण्यात आला आहे. जयंत पाटलांच्या पोस्टची जोरदार चर्चा झाली होती. अशातच आता रोहित पवार (Rohit Pawar) यांनी केलेल्या वक्तव्यामुळे आता शरद पवार गटातच श्रेयवादाची लढाई सुरू झालीये का? असा सवाल विचारला जात आहे. 

रोहित पवार नेमकं काय म्हणाले?

लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादीला घवघवीत यश मिळालं, याचं श्रेय कार्यकर्त्यांना दिलं गेलं पाहिजे. गावागावात जाऊन त्यांनी काम केलंय. मी फक्त एवढंच म्हणतील काहीजण म्हणतील किंवा मी सुद्धा म्हणेल, मी किंगमेकर आहे.. मी 'सेनापती' आहे.., पण हे फक्त एक दोन सेनापतीचं काम नव्हतं तर तुमच्यासारख्या सामान्य कार्यकर्त्यांने केलेल्या कामामुळे हे यश आपल्याला मिळालं आहे. पवार साहेबांनी जे कष्ट या वयामध्ये घेतलेत, त्याचं हे फळ आहे. येत्या काळात आपल्याला एकत्रित रहायचंय, असंही रोहित पवार यांनी म्हटलंय. त्यामुळे आता रोहित पवार यांना निशाणा नेमका कोणावर होता? असा सवाल विचारला जाऊ लागला आहे. रोहित पवारांनी भाषणावेळी निवडणुकीत बजावलेल्या मोलाच्या कामगिरीबद्दल जयंत पाटील यांचे आभार देखील व्यक्त केले.

पुढच्या डिसेंबर महिन्यात शरद पवार 85 वर्षांचे होते आहेत, त्यामुळे येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत आपल्याला कमीत कमी 85 जागा निवडून द्यायच्या आहेत, असा एल्गार रोहित पवारांनी यावेळी केला. लोकसभेत आपले 8 खासदार निवडून आले, 2 उमेदवार जिद्दीने लढले. नकली चोरलेली राष्ट्रवादी त्यांचा स्ट्राईक रेट हा केवळ 25 टक्के होता. भाजपचा स्ट्राईक रेट 34 टक्केच होता, अशी टीका रोहित पवार यांनी केली. लोकसभेचं यश डोक्यात गेलं नाही पाहिजे, आपल्याला विधानसभा मोठ्या जिद्दीने लढायची आहे, असंही रोहित पवार यांनी यावेळी म्हटलंयय.

दरम्यान, अजित पवारांच्या राष्ट्रवादीतले नेते शरद पवारांच्या पक्षात परत जाणार का? याची पुन्हा चर्चा सुरु झालीय. कारण संपर्कात आहेत ते येणारच आहेत. मला आकडा विचारु नका, असं सूचक विधान जयंत पाटील यांनी केलंय. तेव्हा अजित पवार गटातील नेते शरद पवार गटात घरवापसी करण्याबाबतच्या चर्चांना उधाण आलंय. त्याआधी माझा फोनचा वापर आजकाल वाढलाय, असं म्हणत जयंत पाटलांनी सुचक संकेत दिले होते. अशातच आता अजित पवार गटात चलबिचल सुरू झाल्याचं चित्र पहायला मिळतंय.