गणेश कवडे, झी मीडिया, मुंबई : तुमच्याविरोधात तक्रार आहे. त्यासाठी तुम्हाला पोलीस ठाण्यात हजर रहावं लागेल, असं जर तुम्हाला कोणी पोलिसाने अडवून म्हणालं तर? तेव्हा तुम्ही काय कराल? यावेळी ते पोलीस खरे आहेत की खोटे? आपला खरंच काही गुन्हा किंवा तक्रार असेल का? कसलाच विचार न करता तुम्ही घाबरुन, ते जे म्हणतील ते तुम्ही करण्यास तयार होतात. बरोबर ना? असाच काहीसा प्रकार मुंबईच्या गोरेगावमध्ये घडला आहे.
नेमकं काय घडलं?
मुंबईच्या गोरेगावसारख्या भागात पोलीस असल्याची खोटी बतावणी करत फसवणुकीचा प्रकार उघडकीस आला आहे. गोरेगावच्या आयटी पार्क परिसरात रवी नावाच्या व्यक्तीसोबत हा फसवणुकीचा प्रकार घडला आहे. दोन अज्ञात व्यक्तीने रस्त्यात अडवून तुझ्याविरोधात तक्रार असल्यामुळे तुला पोलीस ठाण्यात यावं लागेल असं म्हणत गाडी बसवून जबरदस्तीने घेऊन जाण्याचा प्रयत्न केला. जर तुला यामधून वाचायचं असेल तर 10 हजार रुपये द्यावे लागतील. नाही तर तुझ्या मित्रांनाही अटक करावी लागेल असं सांगून लुटले. बनावट पोलीस असल्याचे समजताच रवी यांना दोघांविरोधात गुन्हा दाखल केला.
पोलिसांनी केले बनावट पोलिसांना अटक -
गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांनी दोघांचा शोध घेण्यास सुरुवात केली. पोलिसांनी दोन्ही सख्ख्या भावांना अटक केली. आरोपींविरोधात खंडणी, फसवणूक, चोरी असे विविध गुन्हे दाखल करण्यात आले आहे. त्यांच्याकडून सरकारी कागदपत्रे तसेच गुन्ह्यात वापरण्यात आलेली गाडी देखील जप्त करण्यात आली आहे.