Maratha Reservation Latest News: मराठा आरक्षणाच्या मागणीवरुन मनोज जरांगे पाटील यांनी सरकारला घेरलं आहे. मनोज जरांगे हे उपोषण स्थगित केल्यानंतर पुन्हा दौऱ्यासाठी बाहेर पडले आहेत. मनोज जरांगे सध्या बीड दौऱ्यावरुन असून विविध ठिकाणी जाऊन ते बैठक घेत लोकांशी संवाद साधत आहे. यावेळी मनोज जरांगे पाटील यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर पुन्हा एकदा टीका केली आहे. राज्यात तीन राजे असून देखील न्याय मिळत नाही अशी टीका मनोज जरांगे पाटील यांनी केली आहे.
"सगे सोयऱ्यांची अधिसूचना काढण्यात आली आहे. जाणूनबुजून एखाद्या मंत्र्याच्या दबावामुळे तुम्ही हा कायदा करत नाही. पूर्वी एक राजा न्याय द्यायचा आता 3 राजे आहेत तरीही न्याय मिळत नाही. त्यामुळे रस्त्यावर लढाई करत आहोत. फक्त आंदोलकांनी आंदोलन शांत करावे, मग तुमच्यावर कसे गुन्हे दाखल करतात कशा नोटिसा देतात ते बघतो. फक्त 11 ते 1 या वेळेत रास्ता रोको करा आणि आज संध्याकाळ पासून गावा गावात धरणे आंदोलन करा. उद्या अंतरवालीत मराठा समाजाची बैठक होणार असून ही निर्णायक बैठक होईल," असे मनोज जरांगे यांनी स्पष्ट केले.
"मी कुणालाही त्रास देत नाही. अधिसूचना त्यांनी काढली. अंमलबजावणी त्यांनी करायला हवी. पूर्वी राजा न्याय द्यायचा. आताच्या राजांना दया माया नाही. जनता बिथरली तर काय करणार आहे. आता तीन रा6जे आहेत. एक राजा न्याय देत असेल तर दोन राजांनी त्याला साथ द्यावी. यांना गुलालाचा राग आलाय. तुम्ही म्हणता रोगर प्या. याला राजा म्हणतात का? सरकार रडीचा डाव खेळत असल्यानं आम्ही देखील डाव बदलत आहे. मला समाज जे म्हणेल ते मी ऐकेन," असे मनोज जरांगे पाटील म्हणाले.
"माझ्यावर कितीही आरोप करा. आता नवीन शोधून आणलाय. उंदरा सारखे मिशी असणारे. तो मुख्यमंत्री आणि आरोग्य मंत्र्यांचा जवळच आहे. त्याच्या माध्यमातून डाव रचनं सुरू आहे. त्यामुळे आता आम्ही यांच्याकडून राज्यच घेणार. मुख्यमंत्री आणि त्यांचा मंत्री दोघेही अडचणीत येणार आहेत. तुम्ही यांना डाव टाकायच्या आधी थांबवा. तो तुमच्या जीवावर करत आहे असं तोच सांगत आहे. अशा प्रकारामुळे जनतेच्या नजरेत तुम्ही पडाल. आम्हीही जनतेत तुमच्यामुळे झालं असं सांगू. गरीब मराठ्यांच्या अन्नात माती कलवू नका. तो लोकांना फोटो दाखवून सांगतो आरोग्यमंत्री आणि मुख्यमंत्री माझ्या पाठीमागे आहेत," असाही आरोप मनोज जरांगेंनी केला.
यावेळी बोलताना मनोज जरांगेंनी मराठा आंदोलकांना आलेल्या प्रतिबंधमक नोटीसीबाबतही भाष्य केलं. त्या नोटिसा स्विकारल्या तरी काही होणार नाही. रास्ता रोको केला म्हणून गुन्हे दाखल केल्यास मला येऊन सांगा. गृहमंत्री यांचं ऐकून गुन्हे दाखल केल्यास जड जाईल, असा इशारा मनोज जरांगेंनी दिला.
"चंद्रकांत पाटील तिथे बसून चर्चा करतील. पण इकडे येणार नाहीत. ते पळवाट काढतील. आमच्या छात्या दुखायला लागल्या तरी ते येईना. तुमचे डाव तुम्ही कसे यशस्वी करतात ते आम्हीसुद्धा बघू. मला कसे अटक करता तेही बघू. सरकार काय डाव आखत आहे ते मी लिहून ठेवलंय. उद्याच्या बैठकीत मी समाजाला सांगणार आहे. काही निर्णय आपल्याला घ्यावेच लागतील," असेही मनोज जरांगे म्हणाले.