सत्र विनाशाचं... १० महिन्यांत ७४० शेतकऱ्यांची आत्महत्या

मराठवाड्यात शेतकऱ्यांची परिस्थिती किती गंभीर आहे, याची ही धक्कादायक आकडेवारी... 

Updated: Nov 19, 2019, 02:48 PM IST
सत्र विनाशाचं... १० महिन्यांत ७४० शेतकऱ्यांची आत्महत्या

गजानन देशमुख-विशाल करोळे, झी २४ तास, औरंगाबाद : मराठवाड्यातून धक्कादायक आणि अस्वस्थ करणारी बातमी... गेल्या महिनाभरात तब्बल ६८ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याचं समोर येतंय. तर गेल्या १० महिन्यांत ७४० शेतकऱ्यांनी जीव संपवलाय. मराठवाड्यात शेतकऱ्यांची परिस्थिती किती गंभीर आहे, याची ही धक्कादायक आकडेवारी... आधी दुष्काळ आणि आता अवकाळी पावसानं मराठवाड्यातल्या शेतकऱ्यांचं जगणं कठीण केलंय. 

नुकतीच, हिंगोलीच्या सेनगाव तालुक्यातल्या सेलसुला गावात संजय चव्हाण या शेतकऱ्यानं आत्महत्या केली. १० जणांच्या कुटुंबाची जबाबदारी संजय यांच्यावर होती. गेली चार वर्षं नापिकी, त्यात यावर्षी पिक आलं पण ते अवकाळी पावसानं उद्धवस्त केलं. बँकेचा वसुलीसाठी तगादा सुरू झाला. या सगळ्याला वैतागून संजयनं गळफास लावला, अशी माहिती देताना संजयची पत्नी शोभाबाई चव्हाण यांच्या डोळ्यांत भविष्याचीही चिंता आहेच. 

असं संकट फक्त चव्हाण कुटूंबीय़ांवरच नव्हे, तर मराठवाड्यात गेल्या महिनाभरात तब्बल ६८ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. मराठवाड्यात पावसानं शेतीचं मोठं नुकसान केलंय. राज्यपालांनी बागायती शेतीसाठी हेक्टरी १८ हजार तर कोरडवाहू शेतीसाठी हेक्टरी ८ हजारांची मदत जाहीर केलीय. पण ही मदत बरीच तोकडी आहे. 

आधी दुष्काळ आणि अवकाळी पावसानं  मराठवाड्यातल्या बळीराजाचं जगणं मुश्कील झालंय... जनतेचा पोशिंदा जगायला हवा, त्यासाठी शेतकऱ्याला मदत आणि उर्मी दोन्ही देण्यासाठी सगळ्याच यंत्रणांकडून ठोस आणि लवकरात लवकर दिलासा देणं गरजेचं आहे.