सांगली : कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांच्या यांच्या मरळनाथपूर या गावात कृषी विभागाच्या अनुदानात लाखो रुपयांचा घोटाळा झाल्याचे उघड झालाय.
सांगली जिल्ह्यातील मरळनाथपूर या गावात कृषी विभागाच्या कोरडवाहू शेती अभियानाच्या माध्यमातून 2014 नंतर अनुदान तत्वावर कृषी पंप वाटप करण्यात आलं. गावातल्या 28 शेतक-यांना कृषीपंपांचं वाटप करण्यात आलं. मात्र हे वाटप करताना शेतक-यांकडे वीज कनेक्शन आहे का नाही, त्याचा दाखला आहे का नाही याची माहिती घेण्यात आली नसल्याचं समोर आलंय.
महावितरणच्या अधिका-यांनीसुद्धा या 28 जणांकडे वीज कनेक्शन नसल्याची माहिती पत्राद्वारे दिलीय. बाळाबाई बापू राऊत या महिलेनंही असं कोणतंही साहित्य किंवा अनुदान मिळालं नसल्याची तक्रार दिलीय.
रामचंद्र दादू खोत या मृत व्यक्तीच्या नावानेही अनुदान लाटण्यात आलंय. तसंच नामसाधर्म्याचा वापर करुनही गैरव्यवहार करण्यात आल्याचा आरोप तक्रारदारांनी केलाय. रामचंद्र दादू खोत नावाच्या व्यक्तीने आपल्याला कृषी पंप मिळाला असल्याचा दावा केलाय. मात्र अर्जासोबत पूर्ण कागदपत्रं का जोडली नाहीत याचं उत्तर त्यांना देता आलं नाही.
तर सदाभाऊ खोत यांच्या मुलाने मात्र या सगळ्यात गैरव्यवहार झाल्याचा आरोप फेटाळलाय. या भ्रष्टाचारप्रकरणी जिल्हाधिका-यांकडे तक्रार देण्यात आलीय. प्रकरणाची चौकशी करुन दोषींवर कारवाईचे आदेश त्यांनी दिलेत.
मरळनाथपूर गावात कृषी अनुदान योजनेतल्या या भ्रष्टाचारावरुन आता दोन गटांमध्ये आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झडू लागल्यात. जिल्हाधिका-यांनी दिलेल्या चौकशी आदेशानंतर या प्रकरणातलं सत्य बाहेर येईल का याकडं नजरा लागल्यात.