Badlapur School Crime: पोलिसांनी 12 तास का लावले? राज ठाकरेंचा संताप, म्हणाले 'हा कुठला हलगर्जीपणा...'

Raj Thackeray On Badlapur School Sexual Assault Case: मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी बदलापूरमधील लैंगिक अत्याचारावर संताप व्यक्त करणारी पोस्ट शेअर केली आहे. यावेळी त्यांनी मनसैनिकांना हा मुद्दा धरुन लावण्यात सांगितलं आहे.   

शिवराज यादव | Updated: Aug 20, 2024, 04:55 PM IST
Badlapur School Crime: पोलिसांनी 12 तास का लावले? राज ठाकरेंचा संताप, म्हणाले 'हा कुठला हलगर्जीपणा...' title=

Raj Thackeray On Badlapur School Sexual Assault Case: मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी बदलापूरमधील लैंगिक अत्याचारावर संताप व्यक्त करणारी पोस्ट शेअर केली आहे. यावेळी त्यांनी मनसैनिकांना हा मुद्दा धरुन लावण्यात सांगितलं आहे. या घटनेत गुन्हा दाखल करून घेण्यातच पोलिसांनी 12 तास का लावले? अशी विचारणा त्यांनी केली आहे. तसंच  एका बाजूला कायद्याचं राज्य म्हणायचं, आणि दुसऱ्या बाजूला पोलिसांच्याकडून झालेला हा कुठला हलगर्जीपणा? असा संताप व्यक्त केला आहे. 

राज ठाकरेंची पोस्ट काय?

"बदलापूरच्या शाळेत लहान लहान मुलींच्या बाबतीत जो भयानक प्रकार घडला आहे तो धक्कादायक आणि संताप आणणारा आहे. मुळात या घटनेत गुन्हा दाखल करून घेण्यातच पोलिसांनी 12 तास का लावले ? एका बाजूला कायद्याचं राज्य म्हणायचं, आणि दुसऱ्या बाजूला पोलिसांच्याकडून झालेला हा कुठला हलगर्जीपणा? माझ्या महाराष्ट्र सैनिकांनी हा मुद्दा लावून धरला आहे, आणि माझं महाराष्ट्र सैनिकांना सांगणं आहे की या प्रकरणात आरोपीला कठोरातील कठोर शिक्षा होईपर्यंत या विषयांत तुमचं लक्ष असू द्या," असं राज ठाकरे म्हणाले आहेत. 

नक्की घडलं काय?

बदलापूर शहरातील पूर्वेत असलेल्या आदर्श शाळा नावाच्या नामांकीत शाळेतील प्रकरणामुळे आज हजारो बदलापूरकर रस्त्यावर उतरल्याचं पाहायला मिळत आहे. या शाळेत शिकणाऱ्या 3 वर्षांच्या 2 चिमुकल्या मुलींवर लैंगिक अत्याचार करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आल्याने पालकांमध्ये संतापाची लाट आहे. पीडित मुलींच्या पालकांना आपल्या पाल्यावर लैंगिक अत्याचार झाल्याचं लक्षात आल्यानंतर शाळेकडे यासंदर्भात तक्रार केली. तसेच पोलीस स्टेशनमध्येही या प्रकरणी तक्रार दाखल करण्यात आली. चिमुकल्या मुलींवर लैंगिक अत्याचाराचा प्रकार घडला असताना पोलिसांकडून तक्रार दाखल करुन घेण्यास दिरंगाई झाल्याने पालकांचा संताप अनावर झाला आणि या प्रकरणाला आंदोलनाचं स्वरुप मिळालं.

कसा उघडकीस आला हा प्रकार?

सदर शाळेमध्ये छोट्या शिशुच्या वर्गात शिकणाऱ्या 3 वर्षाच्या एका मुलीने शाळेत मदतनीस असलेल्या 'दादा' नावाच्या व्यक्तीने माझ्या गुप्तांगाला हात लावल्याचं पालकांना सांगितलं. मुलीने सांगितलेला प्रकार समजल्यानंतर तिच्या पालकांनी तिच्याच वर्गात शिकणाऱ्या दुसऱ्या मुलीच्या पालकांना मुलीने सांगितलेला प्रकार कळवला. हा सारा प्रकार ऐकून दुसऱ्या मुलीच्या पालकांना शंका आल्याने त्यांनी आपल्या मुलीकडे याबद्दल चौकशी करण्याचं ठरवलं. मात्र त्यापूर्वी त्यांनी आपल्या मुलीची बदलापूरमधील एका रुग्णालयामध्ये तपासणी केली. वैद्यकीय तपासणीमध्ये या मुलीबरोबर लैंगिक अत्याचार झाल्याचं स्पष्ट झालं. 

गुन्हेगाराला अटक; वय 24 वर्ष

बऱ्याच वादावादीनंतर 16 ऑगस्ट रोजी रात्री 10 च्या सुमारस पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करुन घेतला. बालकांवरील लैंगिक अत्याचार आणि लैंगिक अत्याचारापासून संरक्षण अधिनियमअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांनी या प्रकरणामध्ये तपास करुन आरोपीसा अटक केली. अटक केलेला आरोपी 24 वर्षांचा असून तो या शाळेतील सफाई कर्मचारी असल्याचेही अंबरनाथचे सहायक पोलीस आयुक्त सुरेश वरडे यांनी सांगितले आहे.