ठाणे : मनसे (MNS) अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांची आज ठाण्यात होणारी सभा वादळी ठरण्याची चिन्हं आहेत. 2019 च्या लोकसभा निवडणूक प्रचारात राज ठाकरे यांच्या लाव रे तो व्हिडीओनं खळबळ उडवून दिली होती. आज पुन्हा लाव रे तो व्हिडीओ पाहायला मिळण्याची शक्यता आहे. आजच्या उत्तर सभेत राज ठाकरे विरोधकांना काय उत्तर देतात आणि भोंग्याबद्दल काय बोलतात, याची उत्सुकता आहे.
गुढीपाडव्याच्या दिवशी झालेल्या सभेत राज ठाकरे यांनी मशिदीवरील भोंगे उतरवावेच लागतील असं वक्तव्य केलं होतं. त्यानंतर या वक्तव्याचे राजकीय पडसाद उमटले. राज ठाकरे यांच्या वक्तव्यावर अनेक राजकीय प्रतिक्रिया आल्या. मनसेच्या टीझरमध्ये अजित पवार, संजय राऊत आणि शरद पवार यांनी केलेल्या प्रतिक्रिया दाखवण्यात आल्या असून या सर्व टीकांना राज ठाकरे करारा जबाब देणार असं म्हटलं आहे.
शिवाजी पार्क येथील सभेनंतर शरद पवार यांनी राज यांच्यावर टीका करताना एखादी सभा घेऊन बोलतात आणि गायब होतात अशी टीका केली. तर, उद्धव ठाकरे यांनी देशात आणखी एक बनावट हिंदुहृदयसम्राट बनविण्याचा प्रयत्न भाजप करत असल्याचा आरोप केला होता.
पुण्याचे शहर अध्यक्ष वसंत मोरे आणि काही मुस्लिम पदाधिकाऱ्यांनी राजीनामेही दिले. त्यातच उद्या ठाण्यात लगेचच दुसरी सभा होत आहे. यामुळे राज ठाकरे नेमका कुणावर निशाणा साधणार याकडे लक्ष लागलं आहे.
२०१९ च्या लोकसभा निवडणूक मनसेचं लाव रे तो व्हिडिओ पॅटर्न चांगलाचा लोकप्रिय झाला होता. अनेकांनी या पॅटर्नचा धसका घेतला होता. त्यानंतर आता ठाण्यातील उत्तरसभेत पुन्हा एकदा लाव रे तो व्हिडिओ ऐकायला मिळणार आहे. याबाबत मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी एक ट्विट केलं आहे.
राजसाहेबांच्या गुढी पाडवा मेळाव्यानंतर ज्यांना लाव रे तो व्हिडिओची खूप आठवण येत होती त्यांच्यासाठी आजची सभा खास, असं संदीप देशपांडे यांनी म्हटलं आहे.
मनसेची जय्यत तयारी
राज ठाकरे यांच्या सभेसाठी मनसेने जय्यत तयारी केली आहे. तब्बल 200 चारचाकी आणि एक हजार दुचाकीस्वारांची रॅली ठाणे चेकनाक्यावरुन कार्यक्रमाच्या ठिकाणांपर्यंत काढण्यात येणार आहे.