'रशिया-युक्रेन वॉरचा मी महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये प्रचार करीन'; राज ठाकरे असं का म्हणाले?

MNS Chief Raj Thackeray Answer: मनसे अध्यक्ष राज ठाकरेंना मुंबईतील पत्रकार परिषदेमध्ये विचारण्यात आलेल्या प्रश्नावर उत्तर देताना त्यांनी हे विधान केल्याचं पाहायला मिळालं.

स्वप्निल घंगाळे | Updated: Jun 24, 2024, 02:47 PM IST
'रशिया-युक्रेन वॉरचा मी महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये प्रचार करीन'; राज ठाकरे असं का म्हणाले? title=
पत्रकारांशी बोलताना राज ठाकरेंचं विधान

MNS Chief Raj Thackeray Answer: महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे हे त्यांच्या खोचक टीका टीप्पण्यांसाठी ओळखले जातात. पत्रकारांनी विचारलेले प्रश्न असो किंवा भाषणांमध्ये खास आपल्या शैलीत लगावलेले टोले असो राज ठाकरेंचा टायमिंग हा त्यांच्या समर्थकांमध्ये कायमच चर्चेचा विषय असतो. आज मनसेच्या पदाधिकाऱ्यांची मुंबईत बैठक झाली. राज ठाकरेंनी या बैठकीमध्ये पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन केलं. या बैठकीनंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना राज ठाकरेंना पत्रकारांनी काही असे प्रश्न विचारले की राज ठाकरेंनी आपल्या खास खोचक टोलेबाजीने पत्रकारांचीची फिरकी घेतली. 

राज ठाकरेंची खोचक उत्तरं

बैठकीनंतर राज ठाकरे पत्रकारांशी संवाद साधण्यासाठी आले असता त्यांना बैठकीत काय झालं? विधानसभा निवडणुकीची तयारी, विधानसभेला किती जागा लढवणार? यासंदर्भातील प्रश्न विचारण्यात आले. पत्रकारांनी अशुद्ध मराठीमध्ये विचारलेले प्रश्नही राज यांनी खोडून काढले. राज ठाकरेंनी खास आपल्या शैलीत या प्रश्नांना उत्तरे दिलं. काही प्रश्न त्यांना खटले तर त्यांनी ते बोलून दाखवलं. एका पत्रकाराने विधानसभेसाठी काय तयारी करत आहात? किती जागा लढण्याची शक्यता आहे? असा प्रश्न विचारला असता राज यांनी दिर्घ पॉज घेऊन, "आता सांगू? सगळं आता सांगून टाकू?" असा प्रतीप्रश्न केला. राज ठाकरेंचा हा हजरजबाबीपणा पाहून उपस्थितांमध्ये एकच हसू पिकलं. 

थेट रशिया युक्रेनाच उल्लेख

यादरम्यान, राज ठाकरेंना एका महिला पत्रकाराने, "आगामी विधानसभा निवडणुकीमध्ये महाराष्ट्राच्या विकासाच्या दुष्टीकोनातून महत्त्वाचे अनेक मुद्दे आहेत. जे मुद्दे आता हायलाइट केले जात नाही. या मुद्द्यांना घेऊन निवडणुकीत उतरण्याचं काय नियोजन असेल," असा प्रश्न विचारला. हा प्रश्न विचारताना महिला पत्रकार अनेकदा अडखळल्यासारखी आणि गोंधळल्यासारखी वाटत होती. या महिलेचा प्रश्न संपल्यानंतर राज ठाकरेंनी काही क्षण थांबून, "मला असं वाटतं मी आता युक्रेन आणि रशिया वॉरचा मी महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये प्रचार करीन," असं राज म्हणाले. या उत्तरानंतर राज स्वत: मिश्कीलपणे हसले. त्यानंतर, "महाराष्ट्रातलेच प्रश्न येणार ना हो!" असं राज म्हणाले. त्यावर या महिला पत्रकाराने 'अनेक पुढारी आहेत जे...' म्हणत प्रश्न विचारण्याचा प्रयत्न केला असता राज ठाकरेंनी, 'त्यांचं जाऊ द्या. मी माझं सांगितलं,' असं म्हटलं.

नक्की वाचा >> मुंबईतील 50% नवी घरं मराठी माणसांसाठी राखीव? नियम मोडणाऱ्या बिल्डरला 10 लाखांचा दंड?

विकासाऐवजी जातीपातीत तेढं निर्माण केली जाते

विकासाच्या मुद्द्यावर कोणी बोलत नाही असं म्हणत प्रश्न विचारला असता राज ठाकरेंनी, "याचं कारण विकासापेक्षा जातीपातीमध्ये तेढ निर्माण करणं आणि त्यामधून मतं हाती लागत असल्याचं कळल्याने त्याचपद्धतीने पुढे जाणार. मला वाटतं समाजाने ही गोष्ट ओळखणं गरजेचं आहे," असं मत व्यक्त केलं.

नक्की वाचा >> उद्धव ठाकरेंच्या 'बिनशर्ट पाठिंबा' टीकेवर राज ठाकरेंचं 5 शब्दात उत्तर; हात झटकत म्हणाले...

संजय राऊतांच्या विधानावर दोन शब्दात प्रतिक्रिया

उद्धव ठाकरे गटाचे प्रवक्ते संजय राऊतांनी असं विधान केलं आहे की काही लोकांना बांबू लावण्याची गरज आहे. हा प्रश्न ऐकल्यावर राज ठाकरेंनी, "लावा म्हणावं," असं उत्तर दिलं आणि ते निघून गेले.