देवेंद्र कोल्हटकर, नवी मुंबई : 'जसे ५ नगरसेवकांसाठी रूसलात तसेच गोरगरीबांसाठी पुन्हा एकदा रूसा आणि महात्मा ज्योतिबा फुले जनआरोग्य योजनेचा लाभ सगळ्यां कोरोनाबाधित रूग्णांना देण्याचा निर्णय घ्या.' अशी मागणी मनसे नेते गजानन काळे यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे.
मुख्यमंत्र्यांना माझे पत्र..
५ नगरसेवक परत आणायला रूसलात,
तसेच राज्यातील गोरगरीबांसाठी परत एकदा रूसा आणि महात्मा ज्याेतिबा फुले जनआरोग्य योजनेचा लाभ सगळ्या कोरोनाबाधीत रूग्णांना होऊ दया.— Gajanan Kale MNS (@GajananKaleMNS) July 9, 2020
महात्मा ज्योतिबा फुले जनआरोग्य योजना ही महाराष्ट्रातील गोरगरीब आणि असहाय्य जनतेस अनेक आजारांवर पुरेशी शासकीय मदत मिळवून देणारी एक उत्तम योजना आहे. मात्र हीच योजना कोरोनाबाधीत रूग्णांसाठी कुचकामी ठरत आहे. या योजनेतील अटीनुसार जर कोरोनाबाधीत रूग्ण व्हेंटीलेटरवर असेल तरच त्याला या योजनेचा लाभ मिळू शकतो. मात्र सरकारी आकडेवारीचा अभ्यास करता एकूण रूग्णांपैकी १/२ टक्का रूग्णांनाही व्हेंटीलेटरची आवश्यकता भासत नाही. याचाच अर्थ ही योजना महाराष्ट्रातील एकूण कोरोनाबाधीत रूग्णांच्या १ टक्का रूग्णांनाही फायद्याची ठरत नाही. त्यातच शासनाने राज्यातील प्रत्येक जिल्ह्यातील एक किंवा दोनच खाजगी रूग्णालये या योजनेखाली आणल्याने ग्रामीण भागातील जनतेला याचा अजिबात लाभ मिळू शकत नाही. असं मनसेने पत्रात म्हटलं आहे.
'महात्मा ज्योतिबा फुले जनआरोग्य योजनेतून महाराष्ट्रातील १ लाख २२ हजार रुग्णाना मोफत उपचार दिल्याचा दावा आपले राज्याचे आरोग्य मंत्री व मंत्री मंडळातील सहकारी राजेश टोपे यांनी केला आहे. मुळातच आपल्याला कल्पना असेल व आपण माहिती घेतली तर आपल्या लक्षात येईल की महात्मा ज्योतिबा फुले जनआरोग्य योजना ही कोरोनाबाधित रुग्ण व्हेंटिलेटरवर असेल तरच त्या रुग्णाला लागू पडते किंवा त्याला मोफत उपचार मिळतात याचे शेकडो अनुभव महाराष्ट्रातील जनतेला आले आहेत.' असं देखील या पत्रात म्हटलं आहे.
महात्मा ज्योतिबा फुले जनआरोग्य योजनेचा हेल्पलाईन नंबर आणि टोल फ्री नंबर 155388 या वर कॉल केल्यावर हीच माहिती दिली जाते(ती ऑडिओ क्लिप ही आम्ही आपल्याला या पत्रासोबत पाठवली आहे ती आपण जरूर ऐका)हे असताना ही आरोग्यमंत्री असा दावा कसा करू शकतात हा भाबडा प्रश्न आम्हाला पडला आहे. असं या पत्रात म्हटलं आहे.
'संपूर्ण महाराष्ट्रात १ लाख ७० हजार कोरोनाबाधित रुग्ण असताना १ लाख २२ हजार कोरोनाबाधीत रूग्णांना मोफत उपचार महात्मा ज्योतिबा फुले जनआरोग्य योजनेतून कसे मिळाले की इतके रुग्ण व्हेंटिलेटर वर होते..?' असा प्रश्न देखील मनसेचे शहर अध्यक्ष गजानन काळे यांनी उपस्थित केला आहे.
व्हेंटीलेटरची अट काढून राज्यातील सर्व कोविड उपचार करणारी खाजगी रूग्णालये या योजनेखाली आणून ही योजना अधिक व्यापक व जनहितार्थ करावी अशी विनंती मनसेने केली आहे.