पुणे : मनसेकडून (MNS) उद्या पुण्यात हनुमान चालिसा पठण कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) दोन दिवसांच्या पुणे दौऱ्यावर असून आज ते पुण्यात दाखल झाले. उद्या त्यांच्या हस्ते महाआरतीचं आयोजन करण्यात आलं आहे. यावेळी हनुमान चालिसाचं सामूहिक पठण देखील होणार आहे.
या कार्यक्रमाचे पुण्यात ठिकठिकाणी पोस्टर्स लावण्यात आले आहेत. पोस्टरवर राज ठाकरे यांचा उल्लेख हिंदूजननायक असा करण्यात आला आहे. पुण्यातील मनसेचे शहराध्यक्ष बदलीनंतर राज ठाकरे यांचा हा पहिला पुणे दौरा आहे.
पुण्यात मनसेत मतभेद?
पण याधीच पुण्यात मनसेत मतभेद असल्याचं समोर आलं आहे. पुण्याचे माजी शहराध्यक्ष वसंत मोरे (Vasant More) यांनी पक्षाला घरचा आहेर दिला आहे हनुमान चालीसा पठण कार्यक्रमाला जायचं की नाही अजून ठरवलं नाही, उद्या सकाळी राज ठाकरे यांची भेट घेणार असून आपली भूमिका मांडणार असल्याचं वसंत मोरे यांनी म्हटलं आहे.
तसंच हनुमान चालिसा कार्यक्रमाच्या पत्रिकेवर कुठेही मनसेचं नाव नाही, तो पक्षाचा कार्यक्रम आहे की नाही हे माहीत नसल्याने अजून ठरवलं नाही असं वसंत मोरे यांनी म्हटलं आहे. उद्या कार्यक्रम हा पक्षाचा नसून तो अजय शिंदे यांचा कार्यक्रम आहे, असं स्पष्टीकरण वसंत मोरे यांनी दिलं आहे.
गुढीपाडव्याच्या दिवशी राज ठाकरे यांनी मशिदीवरील भोंगा प्रकरणारवर केलेल्या वक्तव्यानंतर आपल्या प्रभागात भोंगे काढणार नाही आणि हनुमान चालिसाही म्हणणार नाही अशी भूमिका वसंत मोरे यांनी घेतली होती. त्यानतंर लगेचच वसंत मोरे यांची पुणे शहराध्यक्षपदावरुन उचलबांगडी करण्यात आली.
आता पुन्हा एकदा उद्याच्या कार्यक्रमानिमित्ताने मनसेत असलेले मतभेद चव्हाट्यावर आले आहेत.