मुंबई बॉम्बस्फोट प्रकरणातील दोषी मोहम्मद हनिफ सय्यदचा मृत्यू

प्रकृतीत बिघाड झाल्यामुळे शनिवारी त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले होते 

Updated: Feb 11, 2019, 10:40 AM IST
मुंबई बॉम्बस्फोट प्रकरणातील दोषी मोहम्मद हनिफ सय्यदचा मृत्यू  title=

नागपूर : २००३ मध्ये मुंबईत झालेल्या बॉम्बस्फोट प्रकरणात दोषी असणाऱ्या मोहम्मद हनिफ सय्यद याचा मृत्यू  झाला आहे. मृत्यूदंड, आजीवन कारावासाची शिक्षा सुनावण्यात आलेला हनिफ हा नागपूरच्या मध्यवर्ती कारागृहात शिक्षा भोगत होता. तिथेच प्रकृतीत बिघाड झाल्यामुळे शनिवारी त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले होते जेथे त्याचा मृत्यू झाला आहे. 

कारागृह प्रशासनाकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार सय्यदच्या प्रकृतीत शनिवारी सायंकाळी अचानक बिघाड झाल्यामुळे त्याला सरकारी वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालय (GMGC) येथे दाखल करण्यात आले होते. रुग्णालयात दाखल केल्यानंतर अवघ्या काही तासांतच त्याचा मृत्यू झाल्याची माहिती कारागृह अधिक्षक राणी भोसले यांनी पीटीआय या वृत्तसंस्थेला दिली.  

हृदयविकाराच्या झटक्यामुळे त्याचा मृत्यू झाल्याचं कळत आहे. पण, तरीही शवविच्छेदनाच्या अहवालातूनच त्याच्या मृत्यूचं मुळ कारण स्पष्ट होणार आहे. हा अहवाल त्याच्या कुटुंबीयांच्या उपस्थितीत सादर करणयात येणार आहे. शवविच्छेदन आणि इतर सर्व कारवाई पूर्ण झाल्यानंतरच त्याच्या नातेवाईकांकडे मृतदेह सुपूर्द करण्यात येणार असल्याची माहितीही भोसले यांनी दिली.

काय होतं बॉम्बस्फोट प्रकरण?

२००३ मधील या प्रकरणात सय्यद, त्याची पत्नी आणि अशरात अन्सारी या तिघांना POTA म्हणजेच (Prevention of Terrorist Activity) अंतर्गत २००९ मध्ये न्यायालयाने दोषी ठरवलं होतं. गेटवे ऑफ इंडिया आणि झवेरी बाझार येथे दोन टॅक्सींमध्ये शक्तीशाली बॉम्बस्फोट घडवून आणल्याप्रकरणी त्यांच्यावर हे आरोप करण्यात आले होते. या भीषण बॉम्ब हल्ल्यात जवळपास ५२ जणांचा मृत्यू झाला होता. तर, २४४ जण जखमी झाले होते. २०१२ मध्ये मुंबई उच्च न्यायालयाने सय्यदच्या आजीवन कारावासाची शिक्षा कायम ठेवल्यानंतर त्याची रवानगी नागपूरच्या मध्यवर्ती कारागृहात करण्यात आली होती.