Monsoon Update : राज्यातील 'या' जिल्ह्यांमध्ये अतिमुसळधार पावसाचा इशारा

विदर्भात मान्सून दाखल पण मुंबईकर अजूनही पावसाच्या प्रतीक्षेत, पाहा तुमच्या जिल्ह्यातील हवामानाचा अंदाज

Updated: Jun 19, 2022, 08:43 AM IST
Monsoon Update : राज्यातील 'या' जिल्ह्यांमध्ये अतिमुसळधार पावसाचा इशारा title=

मुंबई : मुंबईसह उपनगर आणि नवी मुंबईतही पावसाच्या जोरदार सरी आल्याने उकाड्याने हैराण झालेल्या नागरिकांना दिलासा मिळाला आहे. राज्यातील अनेक भागांमध्ये पावसाला सुरुवात झाली आहे. हवामान विभागाने तीन जिल्ह्यांमध्ये ऑरेंज अलर्ट दिला आहे. तर काही ठिकाणी मुसळधार पावसाचा इशारा दिला. 

राज्यात आजपासून पावसाचा जोर वाढण्याची शक्यता असल्याचं हवामान विभागानं म्हटलं आहे. काही ठिकाणी मध्यम ते मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला. मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातही पावसाचा अंदाज आहे. 

दक्षिण कोकणात सोमवार पासून अतीमुसळधार पावसाची शक्यता आहे. मुंबई ठाण्यासह उत्तर कोकणात पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे. रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि रायगड जिल्ह्यात ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. 

पालघरमध्ये मान्सून दाखल झाला असला तरी अजूनपर्यंत हवा तसा पाऊस झालेला नाही. आज काही भागात पावसाच्या काही वेळ हलक्या सरी बरसल्या. तर पावसा अभावी पेरण्या खोळंबल्यामुळे शेतक-यांची चिंता वाढली आहे. 

विदर्भात मान्सूनचं आगमन झालं. विदर्भात अमरावती, वाशिम, गोंदियामध्ये मान्सून दाखल झाला. मान्सून दाखल होताच अमरावतीमध्ये तुफान पाऊस झाला. त्यामुळे जिल्ह्यातला शेतकरी आनंदात आहे. 

विजांच्या कडकडाटासह अमरावती शहरात पावसानं जोरदार बॅटिंग केली. गोंदिया जिल्ह्यातही मान्सून दाखल झाला. जिल्ह्यात जोरदार पावसानं हजेरी लावली. त्यामुळं वाढत्या उष्णतेपासून नागरिकांना दिलासा मिळाला आहे. वाशिम जिल्ह्यातही अनेक ठिकाणी पावसाने हजेरी लावली..जिल्ह्यात मान्सून दाखल झाल्याने शेतीकामाला वेग येणार आहे.