नांदेड : एमपीएससी परीक्षेतील डमी रॅकेटचा ज्या ठिकाणाहून पर्दाफाश झाला त्या नांदेडमध्ये एमपीएससी परीक्षार्थी विद्यार्थ्यांनी मोर्चा काढला. या मोर्चात शेकडो विद्यार्थी सहभागी झाले होते.
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परिक्षेत डमी रॅकेट कार्यरत असल्याचे योगेश जाधव या तरुणाने उघडकीस आणले होते. योगेश जाधव हा तरुण नांदेड जिल्ह्यातील मांडवी या छोट्याशा गावातील रहिवाशी आहे. झी मीडियाने हे प्रकरण लावून धरल्यानंतर स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करणा-या विद्यार्थ्यांमध्ये आयोगाच्या धोरणांविरोधात रोष उफाळून आलाय. ठिकठिकाणी मोर्चांच्या माध्यमातून एमपीएससी भ्रष्टाचाराचा निषेध करण्यात येतोय.
त्याचाच एक भाग म्हणून नांदेडमध्ये मोर्चा काढण्यात आला. आयटीआय इथून जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत हा मोर्चा काढण्यात आला. डमी रॅकेटप्रकरणाची सीबीआयमार्फत चौकशी व्हावी यासाह विविध मागण्यांसाठी हा मोर्चा काढण्यात आला. मागण्या मान्य झाल्या नाही तर मंत्रालयावर मोर्चा काढण्याचा इशारा यावेळी देण्यात आला.