Santosh Deshmukh Murder Case: बीडमधील सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात वाल्मिक कराडचं नाव घेतलं जात आहे. पोलीस सध्या वाल्मिक कराडचा शोध घेत आहेत. दरम्यान वाल्मिक कराडसह अनेकांचे बँक खाती सीआयडीने गोठवल्याची माहिती आहे. सीआय़डीच्या तपासात मोठे धागेदोर हाती लागल्याची माहिती मिळत आहे. यादरम्यान बीडचे पोलीस अधीक्षक नवनीत कॉवत यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला असून, महत्त्वाची दिली आहे. तपास सीआयडीकडे असून आमच्याकडून मागितली जाणारी मदत केली जात आहे असं त्यांनी सांगितलं. यावेळी त्यांनी बीडमधील शस्त्र परवाने रद्द केले जाणार असल्याचंही सांगितलं आहे, तसंच अवैध धंद्यांवर नियंत्रण ठेवण्यासाठी काम करत आहोत असंही सांगितलं आहे.
भाजपा आमदार सुरेश धस यांनी आज पोलीस अधिक्षकांची भेट घेतली. यावेळी त्यांनी शस्त्र परवाने आणि अवैध धंदे यासंदर्भात मागणी केली ."शस्त्राचे जे सर्व परवाने आहेत, त्याचं अवलोकन करण्याचं काम सुरु आहे. ज्यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे, त्याना खरंच शस्त्राची गरज आहे का? याची पाहणी केली जात आहे. ज्यांना गरज नाही त्यांचा परवाना रद्द केला जाईल. यासंबंधी जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा केली आहे," असं पोलीस अधिक्षकांनी सांगितलं.
"शस्त्राच्या फाईलमधील सर्वांची नावं तपासली जात आहेत. शस्त्र परवाना देण्याचा हक्क जिल्हाधिकाऱ्यांकडे असतो. पोलीस कायदा सुव्यवस्थेच्या दृष्टीने त्याची पाहणी करत असतं. त्यांचा भूतकाळ पाहिला जातो. जिथे शस्त्राची गरज नाही तिथे नक्कीच परवाना रद्द केला जाईल," असंही त्यांनी सांगितलं आहे.
"अवैध शस्त्रांसंबंधी मी सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रेस नोट दिली होती. मी तरुणांना अशा प्रकारची दहशत पसरवणारे व्हिडीओ, फोटो व्हायरल होता कामा नये असं सांगितलं आहे. तसं झाल्यास गुन्हा दाखल केला जाईल. आम्ही आधीच तीन-चार गुन्हे दाखल केले आहेत. त्यांच्या शस्त्रांचा परवाना रद्द करण्याचा प्रस्ताव पाठवला आहे," अशी माहिती त्यांनी दिली आहे.
"अंजली दमानिया यांनी जी माहिती दिली होती त्याची चौकशी केली. यावेळी लक्षात आलं की, एक माणसाने दारु पिऊन त्यांना मेसेज केला होता. आम्हाला जे लोकेशन सांगितलं होतं, तिथे काहीच मिळालेलं नाही," असंही त्यांनी सांगितलं आहे. सामाजिक तेढसंदर्भात प्रेस नोटमध्ये सांगितलं आहे. जर तशी पोस्ट समोर आली तर कारवाई केली जाईल अशी माहिती त्यांनी दिली. "बीड पोलीस वरिष्ठांच्या मार्गदर्नाखाली अवैध धंद्यांवर नियंत्रण ठेवण्यासाठी काम करत आहोत. तसंच कायदा सुव्यवस्था राखण्याचा प्रयत्न करेल," असं त्यांनी सांगितलं आहे.