मुंबई- पुणे एक्स्प्रेस वेवर विचित्र अपघात; सहा गाड्यांची टक्कर, तिघांचा मृत्यू

मुंबई लेनवरील वाहतूक काही काळासाठी विस्कळीत 

Updated: Oct 18, 2021, 07:52 AM IST
मुंबई- पुणे एक्स्प्रेस वेवर विचित्र अपघात; सहा गाड्यांची टक्कर, तिघांचा मृत्यू
व्हिडीओ स्क्रीनग्रॅब

खोपोली : मुंबई- पुणे एक्स्प्रेस वेवर एक विचित्र अपघात झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. बोरघाटामध्ये सहा गाड्या एकमेकांवर आदळल्या असून, यामध्ये मुंबई लेनवरील वाहतूक काही काळासाठी विस्कळीत झाली आहे. 

खोपोली येथे झालेल्या या भीषण अपघातामध्ये एका कारचा दोन मोठ्या वाहनांमध्ये चक्काचूर झाला आहे. सोमवारी सकाळी सहा वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला. मुंबईकडे येणाऱ्या कोंबड्यावाहू टेम्पोची बसला धडक बसली आणि यानंतर मागची वाहनंही एकमेकांवर आदळली. 

सदर अपघातानंतर लगेचच बचाव पथक घटनास्थळी दाखल झालं आणि अपघातग्रस्तांपर्यंत मदत पोहोचवली. यानंतर जखमींना नजीकच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मृतांमध्ये कोंबड्यावाहू टेम्पोतील एक व्यक्ती आणि कारमधील व्यक्तीचाही समावेश आहे. दरम्यान, काही काळासाठी या मार्गावरील विस्कळीत झालेली वाहतूक कालांतरानं पूर्वत करण्यात आली.