Mumbai-Pune Highway: मुंबई-पुणे महामार्गावर नेहमीच गाड्यांची वर्दळ पाहायला मिळते. येथे विकेंडला वाहनांच्या रांगा पहायला मिळतात. वेगाने गाड्या पळवल्याने अपघात होण्याची संख्यादेखील या महामार्गावर मोठी आहे. वाहन चालकांनी वाहतुकीचे नियम पाळणे आवश्यक आहे. यासाठी वाहतूक विभाग नेहमीच सतर्क असतो. सुरक्षित प्रवाससाठी दरम्यान मुंबई-गोवा महामार्गावर वाहतूक विभाग 'गतिमान' असल्याचे पाहायला मिळत आहे. वाहतूक विभागाच्या सतर्कतेमुळे, नव्या तंत्रज्ञानाच्या मदतीने नियम मोडणाऱ्या वाहन चालकांवर मोठी दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे. यासाठी वाहतूक विभागाकडून इंटेलिजंट ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टीम म्हणजेच आयटीएमएस यंत्रणेचा वापर करण्यात आलाय. वाहतूक विभागाने नियम मोडणाऱ्या वाहन चालकांकडून किती दंड वसूल केला, याची माहिती घेऊया.
मुंबई-पुणे एक्सप्रेस हायवेवर गेल्या महिन्यात नव्याने सादर करण्यात आलेल्या ITMS (इंटेलिजंट ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टीम) लाँचनंतर पहिल्या पंधरवड्यात वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या तब्बल 18,488 वाहनधारकांना ई-चालान करण्यात आले आहे. अशी माहिती संयुक्त परिवहन आयुक्त शैलेश कामत यांनी दिली आहे. आतापर्यंत 7 लाख 50 हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला.
राज्याचे परिवहन आयुक्त विवेक भीमनवार यांनी 19 जुलै रोजी ही प्रणाली सुरू केली होती. पहिल्या दोन आठवड्यात जवळपास 90 टक्के केसेस या वेगात गाडी चालवल्याबद्दल, 4 टक्के लेन कटिंगसाठी आणि बाकीच्या इतर गुन्ह्यांसाठी जसे की, सीट बेल्ट न लावल्याबद्दल, महामार्गावरील बेकायदेशीर पार्किंग इत्यादी साठी करण्यात आला आहे. या ITMS प्रणालीमुळे पुणे मुंबई एक्सप्रेस हायवेवरील वेगावर नियंत्रण मिळविण्यात यश मिळणार आहे.
तसेच वेगावर नियंत्रण आल्यामुळे अपघातांची संख्या देखील कमी होण्यास मदत होणार आहे. पुणे मुंबई एक्सप्रेस हायवे हा महत्वाचा मार्ग समजला जातो. एक्सप्रेस हायवेवरून दररोज साधारणतः 40 हजार गाड्या ये जा करतात तर विकेंड ला हा आकडा 60 हजार पर्यंत जातो.