‘मुंबई-गोवा महामार्ग रखडण्यास मीच जबाबदार!’ केंद्रीय मंत्री नितीन गडकरींची जाहीर कबुली

Mumbai Goa Highway : मुंबई गोवा महामार्ग बांधू शकलो नाही यासाठी मी स्वतः जबाबदार असल्याची कबुली नितीन गडकरी यांनी दिली आहे. गेल्या कित्येक वर्षांपासून या महामार्गाचे बांधकाम रखडलं आहे. त्यातच आता आपण हे काम करु शकलो नाही, असे नितीन गडकरी म्हणालेत.

आकाश नेटके | Updated: Oct 21, 2023, 03:00 PM IST
‘मुंबई-गोवा महामार्ग रखडण्यास मीच जबाबदार!’ केंद्रीय मंत्री नितीन गडकरींची जाहीर कबुली title=

पराग ढोबळे, झी मीडिया, नागपूर :  गेल्या कित्येक दिवसांपासून रखडलेल्या मुंबई गोवा महामार्गाचा (Mumbai Goa Highway) प्रश्न सध्या जोरदार चर्चेत आहे. मनसेने (MNS) या मुद्यावरुन आंदोलन केल्यानंतर सरकारने हा महामार्ग लवकरात लवकर पूर्ण करण्याची घोषणा केली आहे. मात्र महामार्गाच्या कामाच्या दर्जावरुन सातत्याने टीका केली जात आहे. अशातच केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांनी मुंबई गोवा महामार्गाबाबत महत्त्वाचं वक्तव्य केलं आहे.

मुंबई गोवा हा महामार्ग इतके वर्ष बनू शकला नाही त्यासाठी मी स्वतः जबाबदार आहे. मी त्यासाठी कोणालाही जबाबदार धरणार नाही, असं खुद्द केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी एका मुलाखतीत बोलताना म्हटलं आहे. तसेच या डिसेंबर अखेरपर्यंत मुंबई गोवा महामार्ग बनवून पूर्ण होईल अशी ग्वाही नितीन गडकरी यांनी दिली आहे. नागपुरात एका वृत्तपत्र समूहाच्या वतीने आयोजित ''मनातले गडकरी'' या मुलाखतीत मुलाखतकार प्रसिध्द अभिनेता प्रशांत दामले यांनी विचारलेल्या प्रश्नाचे उत्तर देताना नितीन गडकरी बोलत होते.

"मुंबई गोवा मार्ग पहिले महाराष्ट्र सरकारला काम दिलं होतं. त्यानंतर बऱ्याच अडचणी आल्या. जागा हस्तांतरित करण्याच्या अजूनही येतात. त्यासाठी कोणाला जबाबदार धरत नाही. या रस्त्यासाठी मी 75 ते 80 म्हणजे सर्वात जास्त बैठका घेतल्या आहेत. तरी पण मला म्हणावं तसं यश मिळालं नाही. यावर यावर्षी डिसेंबर महिन्याच्या आत मुंबई गोवा मार्ग पूर्ण होईल. मी मुंबई ते दिल्ली 1380 किलोमीटरचा रस्ता जवळपास पूर्ण केला. पण माझ्या घरासमोरचा दोन किलोमीटरचा रस्ता मी तेरा वर्षापासून बांधू शकलो नाही. नागपुरात बाराशे कोटीचा मल्टी मॉडेल हब स्टेशन होतं ते एकदा मी रद्द केलं. पण आता ते स्टेशन रेल्वे बांधत असून 1200 कोटी लॉजिस्टिक कॅपिटल साठी भारत सरकारने दिले. भारतातील सर्वात मोठा लॉजिस्टिक पार्क तयार करत आहे वादाचे मुद्दे सोडवले भारतातील सगळ्यात मोठा प्रोजेक्ट बनवण्याचा ते स्वप्न आहे ते पूर्ण करेल," असेही नितीन गडकरी म्हणाले.

तसेच तुमचा राजकीय वारसदार कोण असू शकते असा प्रश्न विचारल्यावर नितीन गडकरींनी उत्तर दिलं आहे. 'माझा राजकीय वारसदार भारतीय जनता पार्टीचा काम करणारा छोट्यातला छोटा सामान्य कार्यकर्ता असेल. भाजप ही कार्यकर्त्यांची पार्टी आहे माझ्यावर ते संस्कार आहे. त्या संस्कारातून घडलो मला घडवणाऱ्या कार्यकर्त्यांचे हे सगळं श्रेय आहे,' असे नितीन गडकरी म्हणाले.