40 विद्यार्थ्यांना घेऊन जाणारी स्कुलबस रुळावरच अडकली, समोरुन आली भरधाव ट्रेन अन् तितक्यात...

Nagpur School Bus Incident: नागपुरात सुदैवाने मोठा अनर्थ टळला आहे. 40 विद्यार्थ्यांना घेऊन जाणारी बस रेल्वे रूळांवर अडकली अन्... 

मानसी क्षीरसागर | Updated: Jul 26, 2024, 09:28 AM IST
40 विद्यार्थ्यांना घेऊन जाणारी स्कुलबस रुळावरच अडकली, समोरुन आली भरधाव ट्रेन अन् तितक्यात...  title=
Nagpur news School Bus Carrying 40 Students Stuck On Railway Track

Nagpur School Bus Incident: नागपुरात एक मोठा अनर्थ टळला आहे. 40 विद्यार्थ्यांना घेऊन जाणारी बस रेल्वे रुळांवर अडकून बसली होती. मात्र, एका नागरिकांच्या प्रसंगावधानामुळं मोठा अनर्थ टळला आहे. त्यामुळं 40 विद्यार्थी थोडक्यात बचावले आहेत. नागपूर-छिंदवाडा रेल्वेमार्गावरील खापरखेडा रेल्वे क्रॉसिंगवरही घटना घडली आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. एक स्कूलबस ४० विद्यार्थ्यांना घेऊन जात असताना अचानक रेल्वे फाटक बंद झाले आणि बस तिथेच अडकून फसली. विद्यार्थ्यांनी आरडाओरड केल्यानंतर रेल्वे इंजिन चालकाने समयसूचकता दाखवल्याने वेळीच रेल्वे थांबवली आणि विद्यार्थ्यांचे प्राण बचावले आहेत. 

गुरुवारी दुपारी ४० मुलं घेऊन बस खापरखेडाच्या दिशेने जात होती. रेल्वेक्रॉसिंग ओलांडत असताना अचानक फाटक बंद झाले. त्यामुळे बस रुळावरच अडकली. बससोबतच एक कारही अडकली होती. तितक्यात वेगाने समोरुन नागपूर रेल्वे वेगाने येत होते. रेल्वे वेगाने येत असल्याचे पाहून सर्व घाबरले आणि त्यांनी मदतीसाठी आरडाओरड करण्यास सुरुवात केली. विद्यार्थीही घाबरले होती. त्यांनी जोरजोरात आरडाओरड केली. क्षणा क्षणाने एक्स्प्रेस बसजवळ येत होती. मात्र, एका सुज्ञ नागरिकांमुळं जीवावरचा प्रसंग टळला. 

एका सुज्ञ नागरिकाने प्रसंगावधान दाखवत लाल रंगाचे कठडे रेल्वे रुळावर ठेवले. रेल्वे चालकाला ते कठडे दिसले. त्यामुळे त्याला शंका आल्याने त्याने तातडीने रेल्वेचे ब्रेक दाबले. काही अंतरावर जाऊन ही रेल्वे गाडी थांबली. गाडी थांबल्याचे बघून त्यातील विद्यार्थ्यांसह इतरांनी सुटकेचा श्वास घेतला. त्यानंतर रेल्वे कर्मचाऱ्याने एका बाजूचे फाटक उघडले व रुळावर अडकलेली स्कूलबस आणि कार बाहेर निघाली. विद्यार्थ्यांनी सुटकेचा श्वास घेतला. केवळ दैव बलवत्तर म्हणून प्रवाशांचा जीव वाचला आहे. काळजाचा ठोका चुकवणारा हा प्रसंग फक्त सुज्ञ नागरिकांच्या समयसूचकतेमुळं टळला आहे. 

दरम्यान, खापरखेडा येथे महानिर्मितीचे औष्णिक विद्युत निर्मिती प्रकल्प असून येथे मोठ्या संख्येने स्थायी व कंत्राटी अधिकारी- कर्मचारी कार्यरत आहेत. अधिकारी- कर्मचाऱ्यांसह त्यांच्या कुटुंबियांच्या राहण्यासाठी जवळच महानिर्मितीची कर्मचारी वसाहतीचे गाळे आहे . तेथे राहणाऱ्या अधिकारी- कर्मचाऱ्यांच्या मुलांची शाळेत ने- आण करण्यासाठी एका कंपनीला महानिर्मितीकडून स्कूलबसचे कंत्राट दिले गेले आहे.