Nagpur News : नागपूर रेशीमबाग संघ कार्यालय बॉम्बने उडवून देण्याची धमकी

Nagpur News:  नागपूर रेशीमबाग येथील RSS संघाचे कार्यालय आणि भट सभागृह बॉम्बने उडवून देण्याची धमकी देण्यात आली आहे. धक्कादायक म्हणजे असे निनावी पत्र लिहून खळबळ उडवून देणारा आरोपी महापारेषणचा कार्यकारी अभियंता असल्याची माहिती आहे.

Updated: Dec 1, 2022, 12:15 PM IST
Nagpur News : नागपूर रेशीमबाग संघ कार्यालय बॉम्बने उडवून देण्याची धमकी
संग्रहित छाया

RSS Headquarters Bomb Threat - Nagpur News : नागपुरातील संघाचे  ( RSS ) रेशीमबाग येथील कार्यालय, रेशिमबाग मैदानाजवळील भट सभागृह उडवून देण्याची धमकी देण्यात आली आहे. ही धमकी देताना बॉम्बचे चित्र लावून असा प्रकारचा स्फोट उघडवून आणण्याची धमकी देण्यात आली आहे. ही धमकी देणाऱ्या एका अभियंत्याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. 

भट सभागृह या ठिकाणी धमाका करण्याची धमकी

धमकी देणारा हा महापारेषणचा कार्यकारी अभियंता असल्याची माहिती समोर आली आहे. 25 नोव्हेंबर रोजी नागपुरातील सक्करदरा पोलीस स्टेशनमध्ये एक निनावी पत्र मिळाले होते. त्यामध्ये संघाचा रेशीम बाग येथील कार्यालय, रेशीमबाग जवळील भट सभागृह या ठिकाणी धमाका करु अशी धमकी पत्राद्वारे देण्यात आली होती. सोबतच एक बॉम्बचे चित्रही त्या पत्रावर रेखटण्यात आलेले होते.

पोलिसांना निनावी पत्र, चौकशीत धक्कादायक माहिती

निनावी पत्र मिळाल्यानंतर पोलीस दलात खळबळ उडाली. सक्करदरा पोलीस स्टेशनचे विशेष पथक स्थापन करुन गेले अनेक दिवस धमकी देणाऱ्या व्यक्तीचा शोध घेण्यात येत होता. सीसीटीव्हीच्या माध्यमातून पोलिसांनी नागपूरच्या झिरो माइल येथील पोस्ट ऑफिसमध्ये निनावी पत्र पेटीत टाकणाऱ्या एका व्यक्तीला ताब्यात घेतलं. त्याची सखोल चौकशी करण्यात आली आणि त्या व्यक्तीने याबाबत कबुली दिली.  हे धमकीचे निनावी पत्र मीच लिहिले आहे असे त्याने कबूल केले आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.

पोलिसांना वेगळाच संशय?

सध्या पोलीस अभियंत्याची सखोल चौकशी करत असून मानसिक स्थिती योग्य नसल्यामुळे मी असे केल्याचे तो चौकशीत सांगत असल्याची माहिती आहे. दरम्यान, ज्या दिवशी स्फोट घडवू असे त्या धमकीचे पत्रात लिहिण्यात आले होते, त्याचदिवशी भट सभागृहात महापारेषणचा एक कार्यक्रम होणार होता. तो कार्यक्रम होऊ द्यायचा नाही म्हणून ही निनावी धमकी देण्यात आली होती का, असा संशय पोलिसांना आहे. पोलीस त्या दृष्टीने तपास करत आहेत. त्यामुळे संघाटे कार्यालय उडवायचे होते की, महापारेषणचा कार्यक्रम उधळून लावयाचा होता, या दिशेने पोलीस तपास करत आहेत.