स्टेरॉईड्सच्या उत्तेजनातून वडिलांची हत्या, धक्कादायक घटनेनं नागपूर हादरलं

नागपूरच्या जय विघ्नहर्ता नगरमध्ये जे घडलं ते अंगावर काटा आणणारं आहे

Updated: Apr 29, 2020, 12:31 AM IST
स्टेरॉईड्सच्या उत्तेजनातून वडिलांची हत्या, धक्कादायक घटनेनं नागपूर हादरलं title=

अमर काणे, झी मीडिया, नागपूर : नागपूरच्या जय विघ्नहर्ता नगरमध्ये जे घडलं ते अंगावर काटा आणणारं आहे, थरकाप उडवणारं आहे. रोहित उर्फ विक्रांत पिल्लेवार या २५ वर्षांच्या तरुणाला बॉडीबिल्डिंगचं वेड होतं. रोहित बॉडीबिल्डर आहे, पण हे करताना त्याने स्टेरॉईड्स घ्यायला सुरुवात केली. 

त्यादिवशी रात्री रोहितच्या घरचे सगळे टीव्ही पाहत बसले होते. अचानक रोहित आक्रमक झाला आणि अश्लिल शिव्या देऊ लागला. त्याचा आवेग पाहून आईने त्याला थांबवण्याचा प्रयत्न केला. पण रोहितने आईला थप्पड मारली. यानंतर रोहितच्या वडिलांनीही त्याला आवरायचा प्रयत्न केला, पण रोहितने एका ठोश्यातच वडिलांना खाली पाडलं, आणि वडिलांच्या गळ्यासह शरिराच्या अनेक ठिकाणी चावे घेतले. जन्मदात्या वडिलांच्या नरडीचा घोट घेत रोहितने त्यांची हत्या केली.

रोहितचा आवाज ऐकून शेजारी धावून आले. पण स्टेरॉईडमुळे उत्तेजित झालेला रोहित ८ ते १० जणांनाही आवरत नव्हता. अखेर पोलिसांना बोलावण्यात आलं. शरिर पीळदार करण्यासाठी आणि स्टॅमिना वाढवण्यासाठी बरेच तरुण सध्या स्टेरॉईड्स घेत आहेत. या स्टेरॉईडमुळे राग, द्वेश आणि क्रुरपणाच्या भावना वाढत आहेत, असं न्युरोसर्जन आणि मानसोपचार तज्ज्ञ सांगतात. 

स्टेरॉईड्स शरिराला खूप घातक असतात, मात्र झटपट बॉडीबिल्डिंगच्या नादात अनेक तरुण स्टेरॉईड्स घेत असल्याची खंत पॉवरलिफ्टिंग गोल्ड चॅम्पियन अर्जुन पुरस्कार विजेत विजय मोनिश्वर यांनी व्यक्त केली. 

आकर्षक आणि पीळदार शरिराकरता स्टेरॉईडचा अट्टाहास जीवावर बेततोय. ही स्टेरॉईड्स माणसाला कसा सैतान बनवतात, त्याचं हे सुन्न करणारं उदाहरण आहे.