घोड्यावरून ऑफिसला येण्याची मागितली परवानगी, जिल्हाधिकारीही चक्रावले

घोड्यावरून ऑफिसला येण्याची परवानगी मागण्याचं अजब कारण ऐकून जिल्हाधिकारीही चक्रावरले आहेत.

Updated: Mar 5, 2021, 09:26 AM IST
घोड्यावरून ऑफिसला येण्याची मागितली परवानगी, जिल्हाधिकारीही चक्रावले

नांदेड: राजा किंवा अगदीच पूर्वीच्या काळी घोड्यांवरून फिरण्याची पद्धत होती असं आपण ऐकलं असेल किंवा वाचलं असेल. आता रस्त्यावरून घोड्यावर जाताना फारच क्वचित पाहायला मिळतं. हौस म्हणूनच असावं पण रोज घोड्यावर प्रवास करण्याचा अजब मानस एका कर्मचाऱ्याचा आहे. त्यासाठी त्यानं चक्क जिल्हाधिकारी कार्यालयात जाऊन परवानगी मागितली आहे. नेमका काय आहे हा सगळा प्रकार जाणून घेऊया.

पाठीच्या मणक्याचा त्रास असल्याने जिल्हाधिकारी कार्यालयातील एका कर्माचाऱ्यानं गाडी ऐवजी चक्क घोड्यावरून येण्याबाबत इच्छा व्यक्त केली. इतकंच नाही तर गाडी ऐवजी घोड्याला बांधण्यासाठी कार्यालयाच्या परिसरात जागा मिळावी यासाठी परवानगी देखील मागितली आहे. 

नांदेड जिल्हाधिकारी कार्यालयातील रोजगार हमी योजना शाखेत सतीश देशमुख हे सहाय्यक लेखाधिकारी पदावर काम करतात. सतीश देशमुख यांना काही दिवसांपासून पाठीच्या मणक्याचा त्रास सुरू झाला आहे. त्यामुळे दुचाकीवरून कार्यालयात येऊ शकत नाहीत. 

PHOTOS: लग्नाची वरात अन् उंटावरून नवरदेव दारात
 
कामामुळे कार्यालयात तर यावं लागणार मग यायचं कसं? तर त्यावर सतीश यांनी उत्तम मार्ग शोधून काढला. घोड्यावरून येण्याचा पर्याय त्यांना योग्य वाटला पण तो घोडा बांधायचा कुठे? त्यामुळे त्यांनी कार्यालयात घोड्यासाठी अजब मागणी केली.

दुचाकीवर येण्यास त्रास होत असल्याने घोडा घेण्याचे ठरवलं असून घोडा जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात बांधण्यासाठी  परवानगी द्यावी अशी मागणी देशमुख यांनी एका निवेदनाद्वारे जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे.

भटक्या कुत्र्यांची दहशत; माणसांवर खुनी हल्ले

कर्माचाऱ्याच्या या निवेदनाबाबत जिल्हाधिकारी विपीन इटनकर यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी ही हास्यास्पद मागणी असल्याचे सांगितलं. पेट्रोलचे दर गगनाला भिडले आहेत अशा परिस्थिती अशा पद्धतीची मागणी एकवेळ समजू शकता येते मात्र हे अजब कारण देऊन केलेली मागणी फारच हास्यास्पद असल्याचं जिल्हाधिकाऱ्यांचं म्हणणं आहे. 

पण पाठीच्या मणक्याचा त्रास असतांना घोड्याची परवानगी कर्मचाऱ्या ने मागितल्याने हा विषय चांगलाच चर्चेत आला आहे.