मुंबई : भाजपाच्या जाहीरनामा समितीत नारायण राणे यांचा समावेश करण्यात आलाय. वेगळी निवडणूक लढवण्याची घोषणा करणारे राणे आता भाजपाच्या जाहीरनामा समितीचे सदस्य बनले आहेत. भाजपा अध्यक्ष अमित शहा यांनी या समितीची घोषणा केली. लोकसभेच्या जाहीरनाम्यासाठी ही समिती नेमण्यात आली आहे. विशेष म्हणजे या जाहीरनामा समितीत महाराष्ट्रातून एकमेव नारायण राणे यांचा समावेष आहे. राजनाथ सिंह या जाहीरनामा समितीचे अध्यक्ष असतील. भाजपाच्या खासदारांची दिल्लीत अमित शाह यांच्याबरोबर २ जानेवारीला बैठक झाली होती. त्यामध्ये नारायण राणेही उपस्थित होते.
नारायण राणे यांनी काहीच दिवसांपूर्वी त्यांचा महाराष्ट्र स्वाभिमान पक्ष स्वबळावर निवडणूक लढवेल, अशी घोषणा केली होती. यानंतर दिल्लीत भाजप खासदारांच्या बैठकीला नारायण राणे भाजप खासदार म्हणून उपस्थित होते. या बैठकीनंतर सगळं चित्र फिरल्याचं बोललं जात आहे. आता भाजपच्या जाहीरनामा समितीमध्ये नारायण राणे हे राज्यातलं एकमेव नाव आहे. त्यामुळे राणे हे भाजपसोबत राहणार हे स्पष्ट झालं आहे.
याआधी नारायण राणे भाजपसोबत न जाता राष्ट्रवादी काँग्रेसशी आघाडी करतील आणि रत्नागिरी सिंधुदुर्गची जागा लढवतील, अशी चर्चा होती, पण या सगळ्या शक्यता आता राणेंचा जाहीरनामा समितीमध्ये समावेश झाल्यामुळे मावळल्या आहेत.