औरंगाबाद : नारायण राणे यांच्या स्वाभिमान पक्षाची मराठवाड्यातील पहिली सभा औरंगाबादेत झाली. यावेळी मराठवाड्याच्या मागासलेपणासाठी सर्वच पक्ष जबाबदार असल्याचा आरोप त्यांनी केला. खासकरून शिवसेनेवर त्यांनी चांगलेच तोंडसुख घेतले. हल्लाबोल यात्रेवरून काँग्रेस-राष्ट्रवादीला खडे बोल सुनावले. त्याचबरोबर महागाईच्या मुद्द्यावरून सत्ताधारी भाजपवरही आगपाखड केली.
उद्धव ठाकरे सत्तेत आहेत. ते काय बोलतात ते मला कळत नाही. शेतीतलं उद्धव ठाकरेंना काय कळतं, असा सवाल राणेंनी विचारला. मराठा आरक्षणाचे सगळ्यात मोठे विरोधक उद्धव ठाकरे आहेत, असा आरोप राणेंनी केला. तसंच मराठा आरक्षण मिळाल्याशिवाय मी स्वस्थ बसणार नाही, असं राणे म्हणाले.
शिवसेनेनं औरंगाबादचं वाटोळं केल्याचा आरोपही राणेंनी केला. औरंगाबादचे शिवसेना खासदार चंद्रकांत खैरे यांच्यावरही राणेंनी तोंडसुख घेतलं. खैरे उद्धव आणि आदित्य ठाकरेंच्या पाया पडतात. ठाकरेंच्या घरी बाळ झालं तरी खैरे त्याचाही पाया पडतील, असा टोला राणेंनी लगावला. खैरे काम करत नाहीत फक्त पाया पडतात आणि पद मिळवतात, असं राणे म्हणाले.
अजित पवार मराठवाड्याच्या पाण्यावर बोलतात पण सत्ता असताना प्रश्न सोडवला का नाही, असा सवाल राणेंनी विचारला आहे.
औरंगाबादच्या या सभेमध्ये राणेंनी सत्ताधारी भाजप सरकारवरही निशाणा साधला. महागाई कमी करु, शेतीमालाला हमीभाव देऊ अशा नुसत्याच घोषणा करतात. अंमलबजावणी कधी करणार? कर्जमाफीवरून लोक नाराज आहेत. सरसकट कर्जमाफी द्यायची गरज होती. याच अडचणी सोडवण्यासाठी मी एनडीएमध्ये आलो आहे, असं वक्तव्य राणेंनी केलं आहे.