आश्रमचालकच निघाला नराधम, आश्रमातील 5 मुलींचे लैंगिक शोषण, नाशिकमधला धक्कादायक प्रकार

मुलीच्या तक्रारीनंतर इतर विद्यार्थिनींनी पोलिसांकडे आपला जबाब नोंदवला आणि त्यानंतर वैद्यकीय चाचणीत धक्कादायक माहिती समोर आलीय

Updated: Nov 27, 2022, 05:16 PM IST
आश्रमचालकच निघाला नराधम, आश्रमातील 5 मुलींचे लैंगिक शोषण, नाशिकमधला धक्कादायक प्रकार title=
पोलीस उपायुक्त किरणकुमार चव्हाण

योगेश खरे, झी मीडिया, नाशिक : नाशिकमध्ये (Nashik) एका आश्रमचालकाला अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याप्रकरणी अटक (ashram operator arrested) करण्यात आली आहे. त्याच्यावर एका अल्पवयीन मुलीसह सहा मुलींवर बलात्कार केल्याचा आरोप आहे. म्हसरूळच्या आश्रमातील संचालकाने एक नव्हे तर एकूण सहा अल्पवयीन विद्यार्थिनींचे शोषण केल्याचे समोर आले आहे. अल्पवयीन मुलीची तक्रार आल्यानंतर पोलिसांनी आश्रमात शिकणाऱ्या इतर विद्यार्थिनींची चौकशी केली होती. त्यानंतर ही धक्कादायक बाब उघड झाली आहे. पोलिसांनी या प्रकरणी संचालक हर्षल बाळकृष्ण मोरे याला अटक केली आहे.

आश्रमातील एका अल्पवयीन मुलीने अत्याचाराची तक्रार दिली होती. त्यानंतर अन्य मुलींनीही पोलिसांकडे अत्याचाराबाबतचा जबाब नोंदवला होता. त्यानंतर वैद्यकीय तपासणीत अन्य मुलींचेही लैगिंक शोषण झाल्याचे समोर आले आहे. या घटनेने नाशिक हादरले असून, अत्याचार पीडित शाळकरी मुलीस बालगृहात दाखल करण्यात आले आहे. या वसतिगृहातील सर्व मुलींची शुक्रवारी रात्री उशिरापर्यंत वैद्यकीय तपासणी सुरू होती. 

म्हसरूळ येथील आश्रमात विद्यार्थिनीवर बलात्कार करणाऱ्या संशयित संचालक हर्षल बाळकृष्ण मोरे याला पोलिसांनी अटक केली आहे. न्यायालयाने हर्षल मोरेला बुधवारपर्यंत पोलीस कोठडी देण्यात आलीये. त्याच्याविरुद्ध बलात्कार, लैंगिक गुन्ह्यांपासून बालकांचे संरक्षण कायदा (पोक्सो) आणि अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

"हर्षल मोरे याच्याविरुद्ध 23 नोव्हेंबर रोजी एका अल्पवयीन मुलीवर बलात्कार झाल्याची तक्रार दाखल करण्यात आली होती. तो नाशिकमध्ये आश्रम चालवतो. चौकशीनंतर त्याने आणखी 5 मुलींवर बलात्कार केल्याचे निष्पन्न झाले. काल आरोपींविरुद्ध पाच गुन्हे दाखल करण्यात आले," आहेत अशी माहिती, पोलीस उपायुक्त किरणकुमार चव्हाण यांनी दिली.

दरम्यान, आरोपी आपल्या सासूसह ही आश्रम शाळा चालवत होता. यापूर्वीही गतिमंद आश्रम शाळेत त्याने असाच प्रकार केल्याच समोर आले आहे. नाशिक जिल्ह्यात आतापर्यंत अशा पद्धतीने लैगिंक शोषण केल्याची गेल्या दहा वर्षातली ही चौथी घटना आहे. मात्र अद्यापही महिला बालकल्याण विभागाला जाग आली नसल्याचे म्हटले जात आहे.