मौजमजा करण्यासाठी महाविद्यालयीन मुलांनी अनोखी शक्कल लढवली आहे. घरची सर्वसाधारण परिस्थिती पण मौजमजा करण्याची हौस पूर्ण करण्यासाठी महाविद्यालयीन मुलांनी सोनसाखळी चोरी केल्याची घटना समोर आली आहे. नाशिकच्या आडगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली आहे. याप्रकरणी दोन जणांना ताब्यात घेण्यात आलं आहे.
नाशिकच्या आडगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत सोनसाखळी चोरीच्या घटना वाढल्याची माहिती समोर आली होती. त्यानंतर नाशिक शहर गुन्हे शाखा युनिट १ च्या पथकाने परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी केली. यावेळी लाल रंगाच्या मोपेडवरुन दोन व्यक्ती सोनसाखळी चोरी करत असल्याचे समोर आले होते. या प्रकरणातील संशयित सिडको परिसरातील असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती.
यानंतर पोलिसांनी दोन महाविद्यालयीन मुलांना ताब्यात घेतले. या दोघांची कसून चौकशी करण्यात आली. यावेळी त्यांनी शहरातील आडगाव आणि म्हसरूळ पोलीस ठाणे हद्दीत प्रत्येकी तीन असे एकूण सहा गुन्हे केल्याची कबुली दिली आहे. घरची परिस्थिती सर्वसाधारण असल्याने त्यांनी सोनसाखळी चोरी करण्यास सुरुवात केली. पहिल्या प्रयत्नात महिलेचे मंगळसूत्र चोरले. त्यातून त्यांना चांगला पैसा मिळाला. सहज पैसे मिळत असल्याने त्या दोन महाविद्यालयीन मुलांनी सोनसाखळी चोरी करण्यास सुरुवात केली.
ते दोघेही संध्याकाळी निर्जन रस्त्यावर महिलांना हेरुन सोनसाखळी चोरी करत असे. यातून मिळालेल्या पैशातून त्यांनी चांगले कपडे, महागडे मोबाईल खरेदी केले. त्याबरोबरच मौजमजा सुद्धा केली, अशी माहिती पोलिस तपासादरम्यान समोर आली आहे. त्यांच्याकडून 6 सोनसाखळी गुन्ह्यातील चोरीस गेलेला मुद्देमाल, त्यात वापरलेली मोपेड आणि मोटार सायकल असा एकूण 6 लाख 70 हजारांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.
सोनसाखळी प्रकरणातील हे दोन महाविद्यालयीन तरुण अल्पवयीन आहेत. ते दोघेही नाशिकच्या सिडको परिसरात वास्तव्यास आहेत. ते नाशिकच्या महाविद्यालयात शिक्षण घेत आहेत. त्या दोघांची परिस्थिती सर्वसाधारण आहे. त्या दोघांनाही मौजमजा करण्याची हौस आणि महागडे मोबाईल वापरण्याची हौस असल्याची माहिती पोलिस तपासात उघड झाली आहे.