योगेश खरे, झी मीडिया, नाशिक : विमा कंपनीतून चार कोटी रुपये लाटण्यासाठी नाशिकच्या (Nashik) सोनेरी टोळीने (Golden Gang) दोन जणांचे खून केलेत.त्यात पहिला खून रामकुंडावरील एका दारुड्या भिकाऱ्याचा तर दुसरा खून अशोक भालेराव नावाच्या व्यक्तीचा करण्यात आला. या हत्येच्या प्रकरणात एका महिलेसह सहा जणांना अटक करण्यात आलीये. या वर्षातली गुन्हेगारीची ही नवीन पद्धत भल्याभल्यांना चक्रावून टाकणारी आहे
असा झाला घटनेचा उलगडा
2021 च्या सप्टेंबर मध्ये अशोक रमेश भालेराव नावाच्या व्यक्तीचा दुचाकी अपघातात मृत्यू झाला होता. इंदिरानगर जॉगिंग ट्रॅकच्या बाजूला त्याचा मृतदेह रस्त्यावर आढळून आला होता. त्यावेळी पोलिसांनी अपघात अशी नोंद करत प्रकरणाची विल्हेवाट लावली होती. मात्र मयताच्या भावाने हा घातपात असल्याचं पोलिसांना सांगितल्याने पुन्हा एकदा तपास करण्यात आला असता विम्याचे पैसे (Insurance Money) लाटण्यासाठीच हा खून करण्यात आल्याचं समोर आलं.
मयत अशोक भालेरावने 2019 पासून विमा कंपन्याकडून 10 वेगवेगळ्या पॉलिसी (Policy) घेत सुरू केल्या होत्या. यात भालेरावच्या जागी बनावट इसमाचा मृत्यु दाखवून कोट्यवधीचा विमा लाटण्याचाचा प्लान होता. यासाठी 2021 च्या फेब्रुवारी महिन्यात गंगाघाटावरील एका भटक्या भिकाऱ्याला शोधण्यात आलं. त्याला स्कॉरपीओत टाकुन त्याची म्हसरूळ परिसरात हत्या करण्यात आली. विमा काढतांना मात्र वय आणि इतर गोष्टी जुळत नसल्याने हा प्लॅन फसत असल्याचे सहाही जणांच्या लक्षात आलं. अखेर या टोळीचा म्होरक्या मंगेश सावकार याने कटाचा भाग असलेल्या मयत भालेरावचाच काटा काढला आणि अपघाताचा बनाव करून चार कोटी दहा लाख रुपये संशयित बोगस पत्नी रजनी उकेच्या अकाउंटवर जमा होऊ दिले आणि त्या नंतर ते आपसात वाटून घेतले.
पोलिसांनी आवळल्या मुसक्या
या प्रकरणात मुख्य संशयित मंगेश बाबूराव सावकार, रजनी प्रणव उके, प्रणव साळवी यांच्यासह आणखी दोघांना अटक केलीये. सावकारच्या दुचाकीच्या डिक्कीत पिस्टल आणि 6 काडतूस पोलिसांनी जप्त केले आहे. फिर्यादी भालेराव यांचा भाऊ आहे आणि त्याला यांच्यावर संशय होता. त्याच्या माहितीमुळे हा सर्व प्रकार उघड करण्यात आलाय. सध्या सर्व आरोपी नाशिकच्या मध्यवर्ती कारागृहात आहेत. त्यांनी याच पद्धतीने अजूनही गुन्हे करून विम्याची रक्कम हडपण्यात आल्याची शक्यताय.
तब्बल दोन वर्षांनी या प्रकरणाचा तपास लागला आहे. या घटनेमुळे पोलिसांमध्ये नोंदवले जाणारे नैसर्गिक मृत्यू व अपघाताचे झालेले मृत्यू हे गुन्हेगारीचा भाग असू शकतात हे समोर आला आहे. सरत्या वर्षात पोलिसांना मिळालेला हा नवीन धडा म्हणावा लागेल.