कुणाल जमदाडे, झी मीडिया, शिर्डी : लाखो लोकांचे श्रद्धास्थान असलेल्या साईबाबांच्या (Sai baba) शिर्डीत (Shirdi News) धक्कादायक प्रकार समोर आला आहे. पोलिसांनी (Police) शुक्रवारी रात्री शिर्डीत विविध ठिकाणी छापे टाकून हाय प्रोफाईल वेश्या व्यवसायाचा (prostitution) पर्दाफाश केला आहे. हा सर्व प्रकार समोर आल्यानंतर शिर्डीत एकच खळबळ उडाली आहे. या धक्कादायक प्रकाराची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी एकाच वेळी सहा हॉटेलवर छापे टाकून सुरु असलेला वेश्याव्यवसाय समोर आणला आहे. या प्रकरणी पोलिसांनी 11 जणांना ताब्यात घेत 15 पीडित महिलांची सुटका केली आहे. श्रीरामपूर (shrirampur) विभागाचे पोलीस उपअधीक्षक संदीप मिटके यांच्या पथकाने ही धडक कारवाई केली आहे.
शिर्डी पोलिसांच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह
श्रीरामपूर विभागाचे पोलीस उपअधीक्षक संदीप मिटके यांच्या धडक कारवाईमुळे शिर्डीत खळबळ उडाली आहे. श्रीरामपूर पोलिसांच्या कारवाईने वेश्या व्यवसाय करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत. पोलीस उपअधीक्षक संदीप मिटके यांच्या पथकाने सापळा रचून शिर्डीतील सहा हॉटेलवर कारवाई केली आणि वेश्याव्यवसाय उजेडात आणला आहे. दुसरीकडे आता शिर्डी विभागाचे पोलीस उपअधीक्षक संजय सातव आणि पोलीस निरीक्षक नंदकुमार दुधाळ यांना शिर्डीत इतक्या मोठ्या प्रमाणावर चालणारा गोरखधंदा माहीत नव्हता का? असा सवाल नागरिकांकडून विचारला जात आहे. या कारवाईनंतर तसेच शिर्डी पोलिसांच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे. दरम्यान, आरोपींविरूद्ध प्रचलित कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सापळा रचून पोलिसांनी केली अटक
शिर्डीत साईबाबांच्या दर्शनासाठी येणाऱ्या भक्तांसाठी सुरु असलेल्या हॉटेलमध्ये हा सर्व प्रकार सुरु असल्याचे समोर आले आहे. प्रतिष्ठित व्यक्तींच्या हॉटेलमध्ये हा सर्व प्रकार सुरू असल्याची माहिती समोर आली आहे. दुसरीकडे इतर हॉटेलवर झालेल्या पोलिसांच्या कारवाईची माहिती मिळताच, अनेकांनी व्यावसायिकांनी हॉटेल बंद केले आहेत. शिर्डीत अनेक हॉटेलमध्ये अशा प्रकारे वेश्या व्यवसाय सुरु असल्याची माहिती पोलीस अधिक्षक मिटके यांना मिळाली होती. शुक्रवारी वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली मिटके यांनी रात्री शिर्डीमध्ये सापळा रचून हॉटेलवर कारवाई केली. मिटके यांनी त्यांच्या पथकासह सहा ठिकाणी छापे टाकून 15 पीडित महिलांची वेश्याव्यवसायातून सुटका केली आहे.
दरम्यान, कोरोना काळात शिर्डी बंद असल्याने अनेक हॉटेल व्यावसायिकांसमोर मोठं आर्थिक संकट निर्माण झालं होते. त्यानंतरही बराच काळ लोकांनी शिर्डीकडे पाठ फिरवली होती. त्यामुळे अनेक जण चिंतेत होते. त्यातूनच हा सर्व प्रकार सुरु झाल्याचे म्हटले जात आहे. तर दुसरीकडे स्थानिक पोलिसांना याची कल्पना नव्हती का असा सवालही नागरिकांकडून केला जात आहे.