योगेश खरे, झी मीडिया, नाशिक : मुरूम उत्खननात आकारलेला सव्वा कोटी रुपयांचा दंड कमी करण्याच्या मोबदल्यात लाच स्विकारताना नाशिकचे (Nashi News) तहसीलदार नरेश बहिरम (Tehsildar Nareshkumar Bahiram) यांना अटक करण्यात आली आहे. दंड कमी करण्यासाठी तहसीलदार नरेश बहिरम यांना 15 लाख रुपयांची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB) अटक करण्यात आली होती. मात्र आता नरेश बहिरम यांच्याकडे कोट्यावधींची बेहिशोबी मालमत्ता असल्याचे समोर आले आहे. नरेशकुमार बहिरम यास विशेष न्यायालयाने आठ ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. महत्वाची बाब म्हणजे महसूल सप्ताह साजरा केला जात असतानाच तहसीलदार नरेश बहिरमला अटक करण्यात आली आहे.
नाशिकच्या राजूर बहुला येथील जमीन उत्खनन प्रकरणात पाचपट दंड आकारणीच्या फेरचौकशीवेळी 15 लाखांची लाच स्विकारताना तहसीलदार नरेशकुमार बहिरम यांना अटक करण्यात आली होती. बहिराम यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने अटक केल्यानंतर न्यायालयाने तीन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. शनिवारी रात्री बहिराम यांना अटक करण्यात आली होती. गुन्हा दाखल करण्याची कायदेशीर प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर तपास यंत्रणेने त्यांच्या गंगापूर रोड येथील घराची झडती घेतली होती. त्यावेळी बहिराम यांच्या घरातून मोठं घबाड सापडलं आहे.
रविवारी बँकांना आणि इतर कार्यालयांना सुट्टी असल्याने बहिरम यांच्या संपत्ती आणि मालमत्तांचा शोध तपास यंत्रणेला घेता आला नव्हता. मात्र बहिराम यांच्या घरझडतीमध्ये 40 तोळे सोनं, 20 तोळे चांदी आणि चार लाख 80 हजार रुपयांची रोकड सापडली आहे. बहिराम यांची नाशिकसह इतर ठिकाणी असलेल्या प्लॉट जमिनी आणि इतर मालमत्ता असल्याचीही माहिती समोर आली आहे. तपास यंत्रणेकडून या सर्व मालमत्तांची कागदपत्रे मिळवण्याचा प्रयत्न शासन स्तरावर सुरु करण्यात आला आहे. त्यांच्या एका बँकेमधील लॉकर आज उघडून त्यात नेमकं काय आहे हे समोर येणार आहे. त्यामुळे नाशिकच्या लाचलुचपत विभागाला पुन्हा एक कोट्याधीश भ्रष्टाचारी अधिकारी हाती लागला आहे.
नेमकं प्रकरण काय?
राजूर बहुला येथील जमिनीत मुरुम उत्खननाबाबत पाचपट दंड, स्वामित्व धन जागा भाडे मिळून एकूण 1,25,06,220 रुपये दंड जमीन मालकास दंड आकारण्यासंदर्भात नाशिक तहसीलदार कार्यालयाकडे आदेश आले होते. त्या आदेशाविरुद्ध जमीन मालकांनी नाशिकच्या उपविभागीय अधिकाऱ्याकडे अपील दाखल केले होते. त्यानंतर हे प्रकरण फेर चौकशीसाठी तहसीलदार नरेशकुमार बहिरम यांच्याकडे पाठवण्यात आले होते. त्यावेळी बहिरम यांनी हे प्रकरण मिटवण्यासाठी तक्रारदाराकडे 15 लाख रुपयांची लाच मागितली होती. लाचेची रक्कम शनिवारी बहिरमने कर्मयोगी नगरमधील राहत्या घराच्या इमारतीतील पार्किंगमध्ये स्वीकारली होती. यावेळी सापळा रचून लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने बहिराम यांना रंगेहाथ पकडले. त्यानंतर बहिरम यांच्याविरुध्द भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.