close

बातमी थेट मेलबॉक्सलाकाही निवडक बातम्या थेट तुमच्या ईमेल बॉक्सला…

सायकलचा ब्रेक डोळ्यात घुसून मेंदूतून बाहेर

सायकल चालवताना सावधान...

Updated: Jul 17, 2019, 05:40 PM IST
 सायकलचा ब्रेक डोळ्यात घुसून मेंदूतून बाहेर

योगेश खरे झी मीडिया, नाशिक : लहान मुलगा म्हटलं की, त्याला सायकल शिकवण्यासाठी प्रत्येक कुटुंबात उत्साह असतो. मात्र हा उत्साह कधी तरी जीवघेणा ठरू शकतो. सायकल शिकता शिकता पडल्याने, एका लहान मुलाचा विचित्र अपघात झाला आहे. सायकलचा ब्रेक डोळ्याच्या खोबणीतून मेंदू पार निघाल्याची धक्कादायक घटना नाशिकमध्ये घडली आहे. 

आठ वर्षांच्या सार्थक काळेने सायकल चालविता यावी म्हणून वडिलांकडे हट्ट धरला. वडिलांनीही सायकल आणून दिली. मात्र, ती शिकताना त्याचा तोल गेला आणि सायकलचा हा ब्रेक त्याच्या डोळ्याच्यावरील खोबणीतून थेट कवटी पार निघाला. सायकलचा ब्रेक डोळ्याला स्पर्शून गेल्याने डोळाही जाण्याचा धोका होता. सायकलच्या ब्रेकने कवटीमध्ये मेंदूलाही धक्का पोहचवला. सार्थकला व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले होते.

सार्थकला उपचारासाठी नाशिकच्या अपोलो रुग्णालयात दाखल करण्यात आले. प्रसिद्ध निरो सर्जन डॉक्टर  संजय वेखंडे यांनी आपल्या पाच दिवसांच्या अथक मेहनतीनंतर सार्थकचा जीव वाचवला. आता सार्थकची प्रकृती स्थिर आहे. त्यावरील बेतलेल्या या घटनेमुळे सर्व पालकांनी आपल्या मुलांना सायकल शिकवताना काळजी घेण्याची गरज आहे. 

या अपघातात सार्थकचा डोळा आणि मेंदू थोडक्यात बचावल्याने सार्थकच्या आईने डॉक्टरांचे तसेच देवाचेही आभार मानले आहेत. सार्थक सुखरुप असून चालतोय फिरतोय मात्र अजून काही गोष्टी बोलण्यास तयार होत नाही, मात्र थोड्या दिवसात सार्थक आपली कामं सुरळीतपणे करेल, अशी अपेक्षा सार्थकच्या वडिलांनी व्यक्त केली आहे.

सार्थकवर शस्त्रक्रिया करणाऱ्या डॉ. संजय वेखंडे यांनी, डोळे आणि मेंदू सांभाळून मुलाला वाचवणे ही खूप अवघड प्रक्रिया होती. मात्र, सार्थकच्या मेंदुजवर रक्ताच्या गाठी झाल्या होत्या. त्या काढून सार्थकचा डोळा वाचवण्यात आला आहे. शस्त्रक्रिया सुखरूपपणे पार पडली असून, सार्थक आता सर्वसामान्यांप्रमाणे जगू शकेल असे त्यांनी म्हटले आहे.