सोनू भिडे, झी मीडिया, नाशिक : आजारपणामुळे नऊ वर्षीय मुलीचा मृत्यू झाला. मुलीच्या तेरवीचा विधी होत असताना आईची तब्बेत खालावली आणि तिचा मृत्यू झाला. या दोघींच्या मृत्यूच्या धक्क्यातून सावरण्याचा प्रयत्न करणाऱ्या बाप-लेकालाही काळाने गाठले. घरात बाप आणि लेकाचा मृतदेह आढळून आला आहे. या घटनेने नाशिक शहरात हळहळ व्यक्त केली जात आहे. अवघ्या महिनाभरात पाथर्डी फाटा परिसरातील वासननगरातील हसतं खेळतं महाजन कुटुंब काळाच्या पडड्याआड गेलं. सुखी कुटुंबाच्या या करुण अंतामुळे अवघं शहर हळहळलं आहे.
लेकीचा आजरापणाने मृत्यू
तुषार महाजन आणि कुटुंब जळगाव जिल्ह्याच्या यावल तालुक्यातील हिंगोना इथले मूळ रहिवाशी. गेल्या दोन अडीच वर्षांपासून महाजन कुटुंब नाशिकच्या (Nashik) पाथर्डीफाटा येथील वासननगर इथं वास्तव्यास होते. तुषार महाजन यांना दोन मूल एक मुलगा कार्तिक 13 वर्षाचा तर मुलगी हर्षदा 9 वर्षाची. हर्षदाला काही दिवसांपूर्वी ताप आला होता. हा ताप तिच्या डोक्यात गेल्याने तिच्यावर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू होते. मात्र पंचवीस दिवसांपूर्वी तिचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.
मुलीच्या मृत्यूच्या धक्क्याने आईचा मृत्यू
चिमुकल्या लेकीच्या मृत्यूचा आई स्वातीला धक्का बसला होता. मुलीच्या मृत्यूनंतर तिचा तेरविचा विधी होत असताना आईची तब्बेत खराब झाली. त्यांना उपचाराकरिता खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र त्यांचाही उपचारादरम्यान मृत्यू झाला.
बाप-लेकाची आत्महत्या ?
15 दिवसात पत्नी आणि 9 वर्षाच्या चिमुकीचा मृत्यू झाल्याने तुषार जगताप याना मोठा धक्का बसला होता. या धक्क्यातून सावरण्याचा आई आणि मुलीच्या निधनामुळे खचलेल्या तुषार आणि कार्तिक यांना धीर देण्यासाठी नातलगांनी बरेच प्रयत्न केलं. मुलाकडे बघून या दु:खातून बाहेर पडा, स्वत:ला सावरा अशा शब्दांत आप्त धीर देत होते. मात्र झालेला आघात तुषार यांना सोसवला नाही. सोमवारी या दोघांचे मृतदेह त्यांच्या राहत्या घरात आढळून आले. घटनेची माहिती मिळताच इंदिरानगर पोलिस ठाण्याचे निरीक्षक अशोक शरमाळे आणि त्यांचे सहकारी दाखल झाले. दोघांचेही मृतदेह शवविच्छेदनासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. तुषार आणि कार्तिकने आत्महत्या केल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे.