Satyajeet Tambe: काँग्रेस की भाजपा? पुढील राजकीय वाटचालीसंदर्भात सत्यजीत तांबेंनी स्पष्टपणे म्हणाले, "मी निवडून..."

satyajeet tambe allegation on nana patole: नाशिक पदवीधर मतदारसंघातील विजयानंतर सत्यजीत तांबेनी पत्रकारपरिषदेमध्ये केले धक्कादायक गौप्यस्फोट, नाना पटोलेंवर साधला निशाणा

Updated: Feb 4, 2023, 06:22 PM IST
Satyajeet Tambe: काँग्रेस की भाजपा? पुढील राजकीय वाटचालीसंदर्भात सत्यजीत तांबेंनी स्पष्टपणे म्हणाले, "मी निवडून..." title=
nashik graduate constituency satyajeet tambe allegation

Satyajeet Tambe On BJP, Congress And Nana Patole: नाशिक पदवीधर मतदारसंघाचे (Nashik Graduate Constituency) विजयी उमेदवार सत्यजीत तांबे (Satyajeet Tambe) यांनी काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंवर (Nana Patole) गंभीर आरोप करताना जाणीवपूर्वकपणे तांबे कुटुंबियांना बदनाम करण्यासाठी कट रचल्याचा आरोप केला आहे. नाशिकमध्ये आयोजित पत्रकार परिषदेमध्ये तांबेंनी निवडणुकीच्या आधी नेमकं काय घडलं, उमेदवारी अर्ज कोणत्या परिस्थितीत भरला, नेमकी दिल्ली आणि महाराष्ट्रामध्ये उमेदवारी भरण्याआधी काय काय चर्चा झाली, नक्की काय घडलं याबद्दलचा खुलासा केला आहे. दरम्यान तांबे यांच्यासंदर्भातील गोंधळामुळे ते भारतीय जनता पार्टीमध्ये जाणार की काँग्रेसमध्ये राहणार यासंदर्भातील संभ्रम कायम असतानाच त्यांनी याबद्दलचं उत्तरही आजच्या पत्रकार परिषदेत दिलं.

आमच्या कुटुंबाला 100 वर्ष पूर्ण होतील काँग्रेसमध्ये 2030 ला

"अनेक आरोप प्रत्यारोप माझ्या परिवारावर झाले. आपण ज्या पक्षामध्ये, ज्या परिवारामध्ये आयुष्यभर राहिलो त्या पक्षाकडून आरोप झाले. मी सांगितलं त्या पद्धतीने आमच्या परिवाराला 2030 साली काँग्रेसमध्ये 100 वर्ष पूर्ण होत आहेत. किती निष्ठेने आम्ही या पक्षात काम केलं हे आम्ही वारंवार सांगण्याचा प्रयत्न केला," असं म्हणत सत्यजीत तांबेंनी पदवीधर मतदारसंघातील निवडणुकीआधी उमेदवारीवरुन झालेल्या गोंधळाबद्दल स्पष्टीकरण दिलं आहे.

माझ्यावर 50 आंदोलनांच्या केस होत्या

यानंतर सत्यजीत यांनी आपला राजकीय प्रवास प्रसारमाध्यमांसमोर मांडला. "मी 2000 साली एमएससीव्हाय प्रदेश सचिव पद देण्यात आलं. तिथून पुढे मी काम करायला सुरुवात केली. 2007 ते 2017 दरम्यान मी जिल्हा परिषद सदस्य होतो. राजीव सातव यांच्या पाठिंब्याने 2011, 2018 ची युवा काँग्रेस निवडणूक लढलो. युवा काँग्रेसचा अध्यक्ष झालो तेव्हा राज्यात काँग्रेसची परिस्थिती वाईट झाली होती. मी अनेक उपक्रम राबवले. मी त्या माध्यमातून चांद्यापासून बांद्यापर्यंत पक्ष वाढवण्याचं काम केलं ज्याची दखल पक्षश्रेष्ठींनी घेतली. 2019 मध्ये पराभव झाला लोकसभेत सर्वांचं मनोबल खचलेलं असताना मी दादर भवनात बैठक घेतली. आम्ही युवकच कसे काँग्रेसला पुढे आणू शकतो यावर चर्चा केली. विधानसभा निवडणुकीसंदर्भात चर्चा केली. विधानसभेमध्ये जिंकलेल्या 44 जागांपैकी 28 जागा जिंकण्यात युवा काँग्रेसचं योगदान आहे. माझ्यावर 50 आंदोलनांच्या केस होत्या. त्या आता जीआर निघाल्याने मागे घेण्यात आल्या आहेत. मी चळवळीतून आलेला कार्यकर्ता आहे," असं सत्यजीत तांबे म्हणाले.

आम्ही पक्षाच्यापलीकडे जाऊन काम केलं आणि...

"सामान्यपणे काँग्रेसमध्ये युवा काँग्रेसचं पद गेल्यानंतर त्या व्यक्तीला कुठेतरी सामावून घेतलं जातं. प्रदेशाध्यक्ष, राष्ट्रीय अध्यक्ष त्या पदावरुन जातो त्याला नंतर कुठेतरी संधी दिली जाते. अशा व्यक्तींना राज्यसभेवर किंवा विधानपरिषदेवर घेतात. मला कुठं तरी संधी द्या असं मी पक्षश्रेष्ठींना सांगायचो. तेव्हा मला सांगायचे की, तुमचे वडील आमदार आहेत. तुम्हाला विधानसभा देता येणार नाही. माझ्या वडिलांनी इथे स्वत: समर्थन तयार केलं. 2009 साली आम्ही या भाजपाच्या बालेकिल्ल्यात जिंकलो. आम्ही पक्षाच्यापलीकडे जाऊन काम केलं आणि त्यामुळे लोक जोडले गेले," असं सत्यजीत तांबे म्हणाले.

22 वर्ष संघटनेसाठी काम केलं त्याचं काय?

"मी अनेकदा काँग्रेसचे प्रभारी एच. के. पाटील यांना भेटलो. मी त्यांना म्हटलं की मला पाच वर्ष, 10 वर्ष आमदारकी देणार नाही असं लिहून घ्या पण काहीतरी जबाबदारी द्या संघटनेमधील. संघटनेत मला पद द्या. संघटनेतून काम करायची संधी द्या. वडिलांच्या जागेवर विधानसभा निवडणूक लढा, असं मला सांगण्यात आलं. तेव्हा मला तीव्र संताप आला. माझ्या वडिलांच्या जागेवर लढायचं असेल तर 22 वर्ष काम केलं संघटनेसाठी त्याचं काय? दुसरी कोणतीही संधी शक्य नाही, असं मला सांगण्यात आलं. मात्र वडिलांच्या जागी लढ असं त्यांचं म्हणणं होतं. तरीही जे काय करायचं ते स्वत:च्या जोरावर करायचं असं माझं मत होतं," असं सत्यजीत तांबेंनी सांगितलं.

फडणवीसांनी ते वाक्य म्हटलं अन्...

"ही सगळी चर्चा सुरु असतानाच पदवीधरची निवडणूक जवळ आली. माझ्या पुस्तकाचं प्रकाशन होतं. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना आमंत्रित केलं. त्यांनी पत्र पाठवलं येऊ शकत नाही. फडणवीस, थोरात, आदित्य ठाकरेंना बोलवलं. वेगवगेळ्या क्षेत्रातील लोकांना बोलवलं. शहरविकास हा राजकारणापलीकडचा विषय आहे त्यामुळे अजितदादांनाही मी बोलवलं. त्यांनी मान्य केलं यायचं पण शेवटच्या क्षणी त्यांना जमलं नाही. या कार्यक्रमामध्ये फडणवीसांनी आपल्या भाषणात म्हटलं की, सत्यजितला संधी द्या नाहीतर आमचा त्याच्यावर डोळा आहे. तिथून चर्चा सुरु झाली. त्यांना जो प्रतिसाद मिळाला. माझ्या जवळच्यांची भावना त्यांनी बोलून दाखवली," असं सत्यजीत तांबे म्हणाले. 

फडणवीस मोठ्या भावासारखे

"माझी आणि फडणवीसांची फार आधीपासून ओळख आहे. ते माझ्या मोठ्या भावासारखे आहेत. माझे दिवंगत बंधू राजीव राजळे जे आमदार झाले युथ फोरम नावाचा तरुण आमदारांचा ग्रप तयार केला होता. त्यावेळी मी जायचो तेव्हा आमची ओळख झाली," असं सत्यजीत तांबेंनी सांगितलं.

शेवटच्या क्षणी घोषणा करु असं ठरलं

"एकीकडे हे सगळं सुरु असताना दुसरीकडे हे सगळं वातावरण पाहता माझी संघटनामला संधी देऊ शतक नाही असं दिसलं. १५ दिवस आधी त्यांनी सांगितलं की सत्यजित तू ही निवडणूक लढवली पाहिजे. मी थांबतो अशी भूमिका वडिलांनी घेतली. वडिलांच्या जागेवर उभं रहावं असं माझं मत नव्हतं. मी आधी नाही बोललो. आम्ही चर्चा केली. थोरात साहेब होते, मी होतो. माझे वडील होतो. चर्चेनंतर आम्ही सर्वांनी पक्षाला सांगितलं की सत्यजीतला लढवूयात. आम्ही तसा निर्णय पक्षश्रेष्ठींना कळला. आपण शेवटच्या क्षणाला जाहीर करुयात की सत्यजित लढेल किंवा डॉक्टर लढतील असं आम्ही एच. के. पाटील यांना सांगितलं. विधानपरिषदेच्या उमेदवाऱ्या दिल्लीत ठरतात. प्रभारींच्या संपर्कात आम्ही होतो. प्रभारीच बघत असतात. हे सगळं मी यासाठी सांगतो की आम्ही पक्षाला वारंवार गोष्टी सांगितल्या," असं उमेदवारीसंदर्भात बोलताना सत्यजीत म्हणाले.

चुकीचे एबी फॉर्म दिले

"निवडणुकीच्या आधी आमची एच. के. पाटील यांच्याशी चर्चा झाली. शेवटच्या क्षणाला निर्णय घेऊ. कोरा एबी फॉर्म पाठवून देतो. तुम्ही हवं त्याचं नाव भरा असं सांगण्यात आलं. अर्ज भरायच्या दिवशी पाटील यांच्याशी चर्चा झाली. 9 जानेवारीला एबी फॉर्म पाहिजे म्हणून प्रदेश कार्यालयाला संपर्क केला. 10 तारखेला माझा माणूस पोहोचला. 10 जानेवारी सकाळी 10 पासून 7 वाजेपर्यंत बसून राहिला. पटोलेंचा फोन आला की या व्यक्तीबरोबर एबी फॉर्म दिला आहे. माणूस दोन एबी फॉर्म घेऊन निघाला. ते फॉर्म सील बंद पाकिटात देण्यात आले.  तो माणूस 11 तारखेला ला सकाळी पोहोचला. आम्ही फॉर्म भरायला सुरुवात केली. पाकिट फोडलं हे जे दोन कोरे एबी फॉर्म दिलेत हे चुकीचे आहेत. हे नाशिक मतदारसंघाचे नाही अशी माहिती समोर आली. एक फॉर्म औरंगाबाद शिक्षक मतदारसंघाचा आणि दुसरा आहे नागपूरचा होता," असं सत्यजीत पाटलांनी फॉर्म दाखवत सांगितलं.

पर्याय देण्यात आला नव्हता

"इतका सेन्सीटीव्ह मुद्दा प्रदेश कार्यालयाने का असा गोंधळ कसा काय केला असा माझा प्रश्न आहे. आजपर्यंत प्रदेश कार्यालयाने एकदाही मान्य केलं नाही की आमची चूक झाली. त्यांनी ही चूक मान्य का केली नाही हा माझा प्रश्न आहे. माझा भाजपाकडून लढायचा डाव होता, अपक्ष लढायाचा डाव होता तर मी पक्षाला कळवलं नसतं. चुकीचे आलेत एबीफॉर्म असं सांगितल्यानंतर दुसऱ्या दिवशी एबी फॉर्म आले. 12 तारखेला जे एबी फॉर्म आले त्यावर वडिलांचं नाव होतं. पर्यायी उमेदवार नाव नील म्हणजे कोणीच नाही असं होतं. इतकी मोठी गंभीर चूक प्रदेश काँग्रेसची होती तर अखिल भारतीय काँग्रेस कमीटी काय कार्यवाही करणार?" असा प्रश्न सत्यजीत तांबेंनी उपस्थित केला आहे.

एकच नाव दिल्लीतून आलं

"परिवाराला बदनाम करण्यासाठी षडयंत्र करण्यात आलं. स्क्रीप्ट तयार होती. माझ्या माणसाला बोलावलं. मुद्दाम असे फॉर्म पाठवले. निर्णय तांबे परिवाराला घ्यायाच होता. जर माझे वडील सांगत आहेत की मला नाही माझ्या मुलाला उभं राहायचं आहे. महाराष्ट्रातील एकाही मतदारसंघातील उमेदवाराचं नाव दिल्लीतून जाहीर झालं नाही. एकाच साडेबाराला फोन आला. ही स्क्रीप्ट थोरातांना आणि तांबेना अडचणीत आणण्यासाठी होती," असा आरोप तांबेंनी केला आहे.

फॉर्मवर इंडियन नॅशनल काँग्रेस लिहिलं होतं

"पाटील यांनी फोन उचलेले नाही, नाना पटोलेंनी फोन उचलला नाही. थोरातांना फोन केला त्यांनी दीड वाजता फोन उचलला. ते म्हणाले एच के. पाटलांना फोन कर. पण त्यांनी फोन उचलले नाही. नंतर थोरात मला म्हणाले की, जे चाललंय ते मला हे पटत नाही. अखेर माझ्याकडे पर्याय नसल्याने मी इंडियन नॅशनल कॉग्रेसन नावाने फॉर्म भरला पण एबी फॉर्म नसल्याने अपक्ष म्हणून स्वीकारला गेला. प्रसारमाध्यमांनी चुकीच्या पद्धतीने बातम्या चालवल्या की अपक्ष फॉर्म भरला," असं सत्यजीत तांबे म्हणाले.

मला पक्षातून बाहेर ढकलण्याचा प्रयत्न

"भाजपामध्ये मला ढकलण्याचं, काँग्रेसमधून बाहेर ढकलण्याचं काम झालं. हे सर्व अर्धसत्य मागचे 25 दिवस सुरु होतं. एवढं होऊनही फॉर्म भरायच्या शेवटच्या तारखेला म्हणजे 12 तारखेला मला पहिला फोन पाटलांचा आला. मी त्यांना सगळा प्रॉब्लेम सांगितला. आपण इंडिपेंडन्ट आहे तुम्ही मला पाठिंबा जाहीर करा असं सांगितलं. 16 तारखेपर्यंत माघार घेण्याची वेळ आहे त्यांनंतर आपण जाहीर करुयात. मी सगळ्यांशी चर्चा केली. राऊतांशी चर्चा केली, पवारांना भेटायचा प्रयत्न केला. अजित पवार, सुप्रिया सुळेंच्या कानावर विषय घातला. मी दिल्लीच्या संपर्कात होतो.  मला दिल्लीतून असं सांगण्यात आलं की एक पत्र लिहून काँग्रेसचा पाठिंबा मागा. हा शब्द अॅड करा तो शब्द अॅड करा यात सारा दिवस गेला आमचा. जाहीर माफी मागावी लागेल, असं मला दिल्लीतून सांगण्यात आलं. मात्र माझी चूक झालेली नाही असं मी सांगितलं. तरी माफी मागण्यास तयार झालो. मी जाहीर माफी मागायला तयार झालो. मी एच के. पाटलांना पत्र लिहिलं. मी त्यांना हे पत्र 19 जानेवारीला पाठवलं," असं सत्यजीत पाटील म्हणाले.

मी माफीचं पत्र दिलं त्यानंतर...

"थोरात साहेब, नाना पटोलेंचं बोलणं झालेलं. 16 तारखेला बोलणं झालं. मला पाठिंबा द्या सांगितलं. एकीकडे दिल्लीशी बोलतोय. दिल्लीशी बोलतोय, माफी मागतोय. प्रदेशाध्यक्ष याला पाठींबा देणार, त्याला पाठींबा देणार, असं सांगत फिरत होते. ज्यांना आम्ही माहिती आहोत त्यांना माहिती आहे की आम्ही पक्षाला फसवू शकत नाही. फॉर्म एबी चुकीचे आहेत. मी माफीचं पत्र दिलं त्यानंतर दुसऱ्या बाजूला महाविकास आघाडीने दुसऱ्या उमेदवाराला पाठिंबा दिला," असं सत्यजीत तांबे म्हणाले.

राहुल गांधींचा उल्लेख

"एका बाजूला राहुल गांधी नफरत छोडो भारत जोडो म्हणतात. या राज्यातील काही काँग्रेसच्या नेत्यांनी द्वेषापोटी आमच्या कुटुंबाला बदनाम करण्यासाठी हा सगळा प्रयत्न केला. खासगीमध्ये, फोन कॉलमध्ये ज्या पद्धतीने बोललं गेलं ते रेकॉर्डींग माझ्याकडे आहेत. मला पक्षाचं नाव बदनाम करायचं नाहीय. ते रेकॉर्डींग ऐकलं तर एखाद्या व्यक्तीच्या मनात एखाद्या कुटुंबाबद्दल किती द्वेष आहे.
ऐकणारे आपलेच लोक होते," असं सत्यजीत यांनी सांगितलं.

सर्वांनी मदत केली म्हणत मनसेचा उल्लेख

"भाजपाने पाठिंबा मागितला नसतानाही भाजपाच्या लोकांनी मला मदत केली. देवेंद्रजींचे आभार व्यक्त करतो. राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी मला मदत केली. शिवसेनेच्या लोकांनी मला मदत केली.
काँग्रेसचे 100 टक्के लोक होते. मनसे, रासपच्या लोकांनी मदत केली. 100 संघटनांनी मदत केली मागच्या चार निवडणुकांचं अॅनलिसीस केलं तर सर्व पक्षीय लोकांनी आम्हाला मदत केली आहे. भाजपाचे अनेक कार्यकर्ते हे सांगत होते की आम्ही कायम तुम्हाला मदत केली आहे. निवडणूक संपल्यावर पुढल्या क्षणी आपण सर्व मतदारांचे असतो," असं सत्यजीत तांबे म्हणाले.

नॅचरल जस्टीस मिळाला नाही

"एका मिनिटांमध्ये निलंबित केलं. शो कॉज नोटीस द्यावी लागते. आम्हाला नॅचरल जस्टीस प्रकार असतो त्याचा लाभ मिळाला नाही. आम्हाला शो कॉज नोटीस देण्यात आली नाही. ज्या पद्धतीची विधान केली जात आहेत त्यामुळे मी पत्रकार परिषद घेतली. पायात पाय घालणं थांबणार नाही तर हात कसे जुळणार?" असा खोचक प्रश्न सत्यजीत तांबेंनी विचारला.

मी काँग्रेस सोडलेली नाही, पण...

तांबे भाजपामध्ये जाण्याची जोरदार चर्चा सुरु असतानाच त्यांनी आपण अपक्ष म्हणून राहणार असल्याचं सांगितलं. काँग्रेसने निलंबन मागे घेतल्यास पुन्हा पक्षात सक्रीय होणार का? असा प्रश्न तांबेंना विचारण्यात आला. "मी अपक्ष म्हणून निवडूण आलो आहे. अनेक संघटनांनी पाठिंबा दिला. मी अपक्ष निवडून आलो असल्याने मी अपक्षच राहीन लोकहिताची काम करण्यासाठी प्राधान्य देईन. मी देवेंद्रजींकडे जाईन, अजितदादांकडे जाईन, थोरातांकडे जाईन, पवारसाहेबांचे आभार मानतो कारण त्यांनी सुरुवातीलाच हा काँग्रेसचा अंतर्गत प्रश्न असून तो त्यांनी सोडवला पाहिजे अशी भूमिका घेतली," असं सत्यजीत तांबे म्हणाले. "मी काँग्रेस सोडली नाही. पण मी अपक्ष आहे आणि अपक्षच म्हणूनच जनतेसाठी काम करत राहणार," असंही ते म्हणाले.