मुंबई : अरबी समुद्रातील नियोजित शिवस्मारकावरून आता हिवाळी अधिवेशात राजकारण तापताना दिसत आहे. सत्ताधारी आणि विरोधक यावरून एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करत आहेत. यावर राष्ट्रवादी नेते नवाब मलिक यांनी प्रतिक्रिया दिली आहे. शिवस्मारकासंदर्भात वरिष्ठ अधिकारी वर्क ऑर्डर द्यायला तयार नव्हते. कनिष्ठ अधिकार्यांनी वर्क ऑर्डर दिली होती. कॅगच्या अहवालातही गैरव्यवहार झाल्याचे ताशेरे त्यांनी ओढले.
मी विधानसभेत हा मुद्दा उपस्थित करणार आहे. आम्ही काम थांबवणार नाहीत पण भ्रष्टाचार झालाय तो उघड करू असे मलिक म्हणाले. मी आणि काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी कागदपत्रांच्या आधारे हे समोर आणले होते. चंद्रकांत पाटील यांनी शिवस्मारकात पैसे खाल्ल्याचं सिद्ध करून दाखवू असे मलिक म्हणाले.
सरकारला चौकशीच्या नावाखाली स्मारकाचे बांधकाम रेंगाळत ठेवायचे आहे, असा पलटवार चंद्रकांत पाटील यांनी केला. एवढेच नव्हे तर सरकारला या प्रकल्पाची चौकशी करायची असेल तर ती रेंगाळत न ठेवता तातडीने करा, असे आव्हानही चंद्रकांत पाटील यांनी सरकारला दिले.
अरबी समुद्रातील शिवस्मारक ही राज्यातील जनतेची अनेक वर्षांची इच्छा आहे. काँग्रेस-राष्ट्रवादीला १५ वर्षांच्या काळात शिवस्मारकासाठी एकही परवानगी आणता आली नाही. मात्र, गेल्या पाच वर्षांमध्ये देवेंद्र फडणवीस यांनी सर्व परवानग्या आणून कामाला सुरुवातही केली. हीच गोष्ट महाविकासआघाडीला खटकत आहे. आपल्याला १५ वर्षांमध्ये जमलं नाही ते आम्हाला पाच वर्ष जनतेला समजू नये, हा महाविकासआघाडी सरकारचा प्रयत्न आहे. त्यामुळे चौकशी लावून शिवस्मारकाचा प्रकल्प रेंगाळत ठेवण्याचा सरकारचा डाव आहे, असे चंद्रकांत पाटील यांनी सांगितले. तसेच शिवस्मारक प्रकल्पाचे १०० कोटींचे काम पूर्ण झाले आहे. मात्र, अजूनही त्याचे पैसे अदा करण्यात आलेले नाहीत. मग आमच्यावर भ्रष्टाचाराचा आरोप कसा काय होऊ शकतो, असा सवाल यावेळी चंद्रकांत पाटील यांनी विचारला.