छगन भुजबळ अजित पवारांची साथ सोडणार? मंत्रिमंडळातून डच्चू देण्याची नेमकं कारणं काय? समजून घ्या

भुजबळांना मंत्रिमंडळात का घेतलं नाही? छगन भुजबळांच्या नाराजीची कारणं काय आहेत. छगन भुजबळ भविष्यात कोणती पावलं उचलणार?

शिवराज यादव | Updated: Dec 16, 2024, 08:11 PM IST
छगन भुजबळ अजित पवारांची साथ सोडणार? मंत्रिमंडळातून डच्चू देण्याची नेमकं कारणं काय? समजून घ्या title=

कृष्णात पाटीलसह ओम देशमुख, नागपूर

फडणवीस सरकारमध्ये समावेश न झाल्यानं छगन भुजबळ नाराज झाले आहेत. विधिमंडळ अधिवेशनात भुजबळांनी जाहीर नाराजी बोलून दाखवली. भुजबळांना मंत्रिमंडळात का घेतलं नाही? छगन भुजबळांच्या नाराजीची कारणं काय आहेत. छगन भुजबळ भविष्यात कोणती पावलं उचलणार? यावर झी 24 तासची स्टोरी ऑफ द डे..

मंत्रिपद न मिळाल्यानं राष्ट्रवादीची मुलूखमैदान तोफ छगन भुजबळ नाराज झाले आहेत. छगन भुजबळांना त्यांची नाराजी लपवता आली नाही. छगन भुजबळांना मंत्रिमंडळात स्थान न दिल्यानं नाराज भुजबळ थेच माध्यमांवरच नाराज झाले.

- सकाळी 10.30 वा.
छगन भुजबळ विधिमंडळात आले. छगन भुजबळांची नाराजी त्यांच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होती. त्यांनी आपल्या मनातल्या नाराजीला वाट करुन दिली. त्यांनी आपण नाराज असल्याचं छगन भुजबळांनी स्पष्टपणे सांगितलं.

- सकाळी 11.00 वा.
छगन भुजबळ विधिमंडळात गेले आणि अवघ्या अर्ध्या तासात परत आले. बाहेर आल्यानंतरही माध्यमांनी त्यांचा पिच्छा सोडला नव्हता. यावेळी त्यांनी माध्यमांच्या प्रश्नांना थेट उत्तर दिली. 
छगन भुजबळ असाच संपणारा नाही असा गर्भीत इशाराही भुजबळांनी देऊन टाकला.

छगन भुजबळांना मंत्रिपद मिळालं नाही म्हणून ते नाराज आहेत असं नाही. त्यांच्या मनातली खदखद बाहेर येण्यासाठी आणखी काही कारणं आहेत. 

भुजबळ का नाराज? 

- भुजबळांना लोकसभा लढायची होती तेव्हा उमेदवारी नाकारली
- भुजबळांनी राज्यसभेचा आग्रह धरला त्यालाही नकार दिला
- मंत्रिपदाची अपेक्षा केली तर आता राज्यसभेची ऑफर दिली

भुजबळांच्या मनात खदखद सुरुच होती. भुजबळ नागपुरातून मुंबईकडं जाण्यासाठी विमानतळावर गेले. तिथंही त्यांनी माध्यमांसमोर त्यांच्या मनातली सल बोलून दाखवली. भुजबळांची पुढची रणनिती काय या प्रश्नावर त्यांनी शायरीनं उत्तर दिलं.

छगन भुजबळांना मंत्रिमंडळातून डच्चू दिला जाण्याची अनेक कारणं दिली जातायत. जाणकरांच्या माहितीनुसार

- छगन भुजबळ अजित पवारांमधील कटूता आताही कायम होती
- जरांगेविरोधामुळं महायुतीला फायदा पण राष्ट्रवादीला तोटा झाला
- अजितदादांना स्वतःचा अस्तित्व असलेला दुसरा नेता मंत्रिमंडळात नको होता
- छगन भुजबळांची देवेंद्र फडणवीसांसोबतची जवळीक भोवल्याचं सांगण्यात येतय
- विधानसभा निवडणुकीत समीर भुजबळांची बंडखोरीही भुजबळांना महागात पडल्याचं सांगण्यात येतंय.

भुजबळांचा पत्ता कट झाल्यानंतर विरोधकांनी भुजबळांबाबत सहानुभूती व्यक्त केली. छगन भुजबळ शरद पवारांसोबत असताना त्यांना कायम मानसन्मान दिल्याचं सुप्रिया सुळेंनी सांगितलं.

छगन भुजबळांसारख्या बड्या नेत्याला मंत्रिमंडळाबाहेर ठेवणं राष्ट्रवादीला परवडणारं नाही. तरीही भुजबळांना बाहेर ठेवण्याचा धोका अजित पवारांनी का घेतलाय हे न उलगडणारं कोडं आहे.