close

बातमी थेट मेलबॉक्सलाकाही निवडक बातम्या थेट तुमच्या ईमेल बॉक्सला…

'शरद पवार हेच माढातील उमेदवार'

निवडणूक लढणार असतील तर, शेकापचाही पाठिंबा 

Updated: Feb 9, 2019, 04:55 PM IST
'शरद पवार हेच माढातील उमेदवार'

मुंबई : आगामी लोकसभा निव़डणूकांचं एकंदर वातावरण पाहता येत्या काळात राष्ट्रवादी काँग्रेसकडून एक महत्त्वाचं नाव निवडणुकीच्या रिंगणात उतरणार असल्याचं कळत आहे. ते नाव म्हणजे खुद्द शरद पवार यांचं. माढा मतदारसंघातून निवडणूक लढवण्याबाबत पक्ष नेत्यांशी चर्चा करून निर्णय कळवतो असं सूचक विधान  राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी नुकतंच केलं आहे. त्यामुळे एका अर्थी येत्या काळात निवडणूक लढवण्याच्या चर्चांवर त्यांनी शिक्कामोर्तब केलं असंच म्हटलं जात आहे.  

शरद पवार हेच माढातील राष्ट्रवादीचे उमेदवार असतील असं विजयसिंह मोहिते पाटील यांनी जाहीर केलं होतं. दिल्लीतील परिस्थीती पाहता पवारांना पंतप्रधान बनण्याची संधी आहे त्यामुळे कार्यकर्त्यांनीच त्यांनी माढा येथून निवडणूक लढवावी अशी मागणी केली आहे. मुख्य म्हणजे या मागणीवर विचार करुन निर्णय घेणार असल्याचं पवारांनी स्पष्ट केलं. 

एकिकडे विचार करुन निर्णय घेऊ असं पवार म्हणत असतानाच, आता त्यांना विचार करण्याची गरजच नाहीय कारण निर्णय झालेला आहे. पक्षाच्या नेतेमंडळींनी घेतलेला हा निर्णय पवारांना मान्य करावा लागेल असं खुद्द विजयसिंह मोहिते पाटील म्हणाले. पवारांनी माढा मतदारसंघातून निवडणूक लढवली असता शेकापंचाही त्यांना पाठिंबा असेल, असं आमदार गणपतराव देशमुख आणि जयंत पाटील यांनीही जाहीर केलं आहे. त्यामुळे राजकीय पटलावरील ही एक मोठी घडामोड आहे, असंच म्हणावं लागेल.