देवेंद्र फडणवीस यांची 'ही' चलाखी महाराष्ट्रात चालणार नाही - रोहित पवार

 फडणवीस हे दुसरीकडे कुठंही बोलले असते तर ते खपून गेले असते. महाराष्ट्र हे खोटं लपून राहणार नाही, अशी बोचरी टीका रोहित पवार यांनी करत समाज माध्यमावर व्हिडिओच शेअर केला आहे.

Updated: Jul 10, 2021, 02:07 PM IST
देवेंद्र फडणवीस यांची 'ही' चलाखी महाराष्ट्रात चालणार नाही - रोहित पवार title=

मुंबई : देशात महागाईत प्रचंड वाढ झाली आहे. पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती गगणाला भिडल्या आहेत. (Petrol - Diesel price hike) काही ठिकाणी सध्या पेट्रोल 108 रुपयांपेक्षा जास्त दराने मिळत आहे. इंधन दरवाढीनंतर केंद्र सरकारवर महाविकास आघाडी सरकारने जोरदार टीका केली आहे. काँग्रेसने राज्यात तीव्र आंदोलन सुरु केले आहे. तर राष्ट्रवादी आणि शिवसेनेकडूनही टीका करण्यात आली आहे. मात्र, या टीकेला भाजपचे नेते आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस  (Devendra Fadanvis) यांनी प्रत्युत्तर देताना राज्य सरकारचे धोरण कारणीभूत असल्याचे म्हटले आहे. पेट्रोल-डिझेल दरवाढीला राज्य सरकार जबाबदार असल्याची टीका केली होती. याला आता राष्ट्रवादीचे युवा आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. फडणवीस हे दुसरीकडे कुठंही बोलले असते तर ते खपून गेले असते. महाराष्ट्र हे खोटं लपून राहणार नाही, अशी बोचरी टीका करत समाज माध्यमावर व्हिडिओच शेअर केला आहे.

ते पुढे म्हणाले, केंद्र सरकार आकारत असलेल्या पेट्रोल वरील करात राज्याला किती पैसे मिळतात? तर केंद्र सरकार पेट्रोलवर आकारत असलेल्या 32.90 रुपयांपैकी महाराष्ट्राला केवळ साडे तीन पैसे मिळतात. तरी केंद्र सरकारचे अपयश लपवण्यासाठी आपण ( देवेंद्र फडणवीस) मात्र राज्याला 12 रुपये मिळत असल्याचे सांगतात, हे सगळे खोटे आहे. विरोधकांना साडेतीन पैशाच्या ठिकाणी 12 रुपये दिसत असतील तर याला काय म्हणावं? सगळीकडं अधिवेशनातील बाराचाच आकडा दिसत असेल तर त्याला इलाज नाही. दिवसाढवळ्या ज्येष्ठ नेत्यांच्या उपस्थितीत असे धडधडीत खोटं बोलणं कुठल्याही नेतृत्वाला शोभणारं नाही, असो टोला रोहित पवार यांनी हाणला.

 रोहित पवार यांनी टीका करताना देवेंद्र फडणवीस यांचे नाव न घेता आरोप केला आहे. खोटं बोलायचं आणि रेटून बोलायचे ही भाजप नेत्यांची जुनी सवयच आहे. पेट्रोलवर लावण्यात येणाऱ्या करातले 12 रुपये राज्यांना मिळतात असं हास्यास्पद विधान भाजपकडून पुण्यात करण्यात आले आहे. देशात इतर कुठंही ही चलाखी चालून गेली असती पण महाराष्ट्रात नाही, असा स्पष्ट इशारा रोहित पवार यांनी दिला आहे.