LokSabha Election: आगामी लोकसभा निवडणुकीसाठी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना पाठिंबा जाहीर केला आहे. गुढीपाडवा मेळाव्यात राज ठाकरे यांनी फक्त नरेंद्र मोदींसाठी आपण महायुतीला पाठिंबा देत असल्याचं जाहीर केलं आहे. दरम्यान त्यांनी आपण निवडणूक लढणार नसल्याचं स्पष्ट करत कार्यकर्त्यांना विधानसभा निवडणुकीच्या तयारीला लागण्याचे आदेश दिले आहेत. राज ठाकरेंच्या निर्णयामुळे मनसे कार्यकर्ते, पदाधिकारी यांच्यात संभ्रमावस्था असल्याची चर्चा आहे. यादरम्यान शरद पवार यांनी राज ठाकरेंच्या निर्णयावर भाष्य केलं आहे.
शरद पवार यांची पुण्यात पत्रकार परिषद पार पडली. यावेळी शरद पवारांनी धैर्यशील मोहिते पाटील दोन दिवसांत प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या उपस्थितीत प्रवेश करणार असल्याची माहिती दिली. तसंच अतुल देशमुख यांनी आज प्रवेश केला. या सर्वांनी कोणतीही अट किंवा अपेक्षा न ठेवता प्रवेश केला असल्याचं शरद पवार म्हणाले आहेत. शरद पवारांनी या पत्रकार परिषदेत अनेक प्रश्नांची उत्तरं दिली. दरम्यान राज ठाकरेंबद्दल विचारण्यात आलं असता त्यांनी दिलेलं उत्तर ऐकून एकच हशा पिकला.
राज ठाकरेंनी नरेंद्र मोदींना पाठिंबा दिल्याच्या निर्णयाकडे कसं पाहता असं विचारण्यात आलं असता ते म्हणाले की, "राज ठाकरे यांचे 3 ते 4 निर्णय गेल्या 10 ते 15 वर्षात पाहिले. कधी भाजपाविरोधात कठोर शब्द वापरत, दूर जाण्याची भाषा केली. तर कधी पाठिंबा जाहीर केला.
कशाची अपेक्षा न ठेवता पाठिंबा दिला म्हणतात. 2 ते 4 दिवसात नक्की काय ते स्पष्ट होईल".
राज ठाकरे काय आहेत हे तुम्हाला मागील 10 ते 15 वर्षात कळलंय का? असं विचारण्यात आलं असता शरद पवारांनी 'मीदेखील सामान्य माणूस आहे' असं उत्तर दिलं. यानंतर पत्रकार परिषदेत एकच हशा पिकला.
एकनाथ खडसेंच्या भाजपा प्रवेशावर ते म्हणाले की, "एकनाथ खडसे यांच्याबाबत टोकाची भूमिका सत्ताधाऱ्यांनी घेतली होती. यातना सहन करण्याची वेळ त्यांच्यावर आली होती. त्यामुळे त्यांना दिलासा मिळत असेल त्याठिकाणी त्यांनी जावं अशी आमची भूमिका होती". त्यांच्या इतक्या चौकशा सुरु केल्या होत्या. व्यक्तिगत संपत्ती जप्त केली. दैनंदिन कुटुंब सुद्धा चालवता येणं त्यांना अवघड केलं त्यामुळे ते हतबल झाले होते असं शरद पवार म्हणाले आहेत.
तसंच आज कोणी भाजपसोबत गेलं का? मागे काय घडलं? याला अर्थ नाही. त्यांनंतर बरंच काही घडलं. त्यामुळे भाजपसोबत जाण्यासाठी माझी सहमती होती हे म्हणण्याला आज काही अर्थ नाही असंही शरद पवार म्हणाले.