Sharad Pawar on Merger with Congress: शरद पवारांनी (Sharad Pawar) आगामी काळात अनेक प्रादेशिक पक्ष काँग्रेसमधे विलिन होतील असं भाकित वर्तवलं आहे. त्यांच्या या विधानानंतर राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे. दरम्यान यानंतर शरद पवार यांनी आपल्या विधानामागील अर्थ समजावून सांगितला आहे. प्रादेशिक पक्ष सरसकट विलीन होतील असं नसल्याचं त्यानी स्पष्ट केलं आहे. यावेळी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासर विरोधकांवरही टीका केली.
"काँग्रेस पक्षाच्या विचाराजवळ असणारे काही पक्ष आहेत. उदाहरणार्थ राष्ट्वादी आणि काँग्रेस स्थापन झाल्यापासून एकत्र काम करत आहेत. अनेक वर्षं एकत्र काम कऱण्याचा अनुभव आहे. आपण अधिक एकत्रित काम करण्याची भावना मांडली असेल तर त्यात आक्षेप घेण्याचं कारण नाही," असं शरद पवार म्हणाले आहेत. प्रादेशिक पक्ष सरसकट विलीन होणार नाहीत हेदेखील त्यांनी स्पष्ट केलं.
काही झालं तरी गांधी, नेहरुंचा विचार आणि भाजपाचा विचार याच्यात काही साम्य नाही असं शरद पवारांनी सांगितलं आहे. राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस जवळपास 2001 पासून आजपर्यंत एकत्र काम करत आहे. आम्ही एकत्रित निवडणुका लढल्या आहेत. अनेक मतदारसंघात काँग्रेसचा उमेदवार आणि राष्ट्रवादीकडून सहकार्य असं होत होतं. आता अजून एकत्रित काम करण्याची आवश्यकता आहे असं शरद पवार म्हणाले आहेत.
दरम्यान अजित पवारांनी शरद पवारांनी भाजपासोबत जाण्याचा निर्णय घेतला होता आणि दिल्लीत यासंबंधी 6 बैठका झाल्या होत्या असा दावा केला आहे. त्यावर शरद पवार म्हणाले की, "आमच्यातील काही सहकारी भाजपासह जाण्याच्या मताचे होते. त्यांनी चर्चा केली तरी निर्णय पक्ष घेत असतं. पक्षाचा निर्णय त्या मताच्या बाजूने नव्हता". शिवसेना स्वतंत्र संघटना आहे. सहकारी म्हणून काम करत असेल तरी त्यांचं स्वतंत्र अस्तित्व आहे असंही शरद पवारांनी सांगितलं.
आतापर्यंत अदानी, अंबानी हे कोणाचे मित्र आहेत अशी देशात चर्चा होती. ज्यांच्याबद्दल चर्चा होत होती आता तेच काँग्रेसवर ढकलत आहेत असं सांगत शरद पवारांनी नरेंद्र मोदींवर निशाणा साधला. गुजरातमध्ये भाजपा कार्यकर्त्यांनी बूथ ताब्यात घेतल्यासंबंधी विचारण्यात आलं असता शरद पवारांनी भाजपा आणि त्यांची राज्यं असणाऱ्या ठिकाणी अशा तक्रारी येत आहेत. महाराष्ट्रातही अशा तक्रारी आल्या आहेत असं सांगितलं. तिन्ही टप्प्यातील मतदान मोदींना अस्वस्थ कऱणारं आहे असंही ते म्हणाले.
मला कोणी त्रास देत नसून, जवळचे लोक प्रेमाने वागत आहेत. आम्हा सर्वांची लागेल ते कष्ट करण्याची तयारी सुरु आहे असं उत्तरही शरद पवारांनी अजित पवारांना दिलं आहे.
शरद पवार यांना बारामतीमधून संपवणार. बारामतीमधून शरद पवार आणि त्यांचे राजकारण भाजपला संपवायचे आहे असं भाजपा नेते चंद्रकांत पाटील म्हणाले आहेत. त्यावर अजित पवारांनी नाराजी जाहीर केली आहे. शरद पवार साहेब हे बारामतीमध्ये निवडणुकीसाठी उभेच नव्हते तर साहेबांचा पराभव करण्याचा प्रश्नच येत नाही. साहेब निवडणुकीला उभे असते तर वेगळी गोष्ट होती. बारामतीत उभे कोण होते, सुनेत्रा पवार आणि सुप्रिया सुळे. पराभव होईल तो या दोघींपैकी एकीचा होईल ना? मग तरीही चंद्रकांत पाटील बारामतीत तसं का बोलून गेले माहिती नाही. जी व्यक्ती उभीच नव्हती त्यांचा पराभव करण्याची भाषा योग्य नव्हती. त्यामुळे चंद्रकात पाटील यांचे ते वक्तव्य चूक होते, हे मी मान्य करतो असं अजित पवार म्हणाले आहेत.