शरद पवारांच्या निवृत्तीला सगळे विरोध करत असताना अजित पवारांनी केलं जाहीर समर्थन, कार्यकर्त्यांना त्यांच्यासमोरच झापलं

Ajit Pawar Supports Sharad Pawar: शरद पवारांच्या निवृत्तीच्या (Sharad Pawar Retirement) निर्णयाला एकीकडे पक्षाचे सर्व नेते विरोध करत असताना एकट्या अजित पवारांनी (Ajit Pawar) त्यांना पाठिंबा दिला आहे. यावेळी त्यांनी गोंधळ घालणाऱ्या कार्यकर्त्यांना चांगलंच झापलं.   

शिवराज यादव | Updated: May 2, 2023, 03:24 PM IST
शरद पवारांच्या निवृत्तीला सगळे विरोध करत असताना अजित पवारांनी केलं जाहीर समर्थन, कार्यकर्त्यांना त्यांच्यासमोरच झापलं title=

Ajit Pawar Supports Sharad Pawar: राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी पक्षाचं अध्यक्षपद सोडत असल्याचं जाहीर केल्यानंतर राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. शरद पवारांनी त्यांचं आत्मचरित्र 'लोक माझे सांगाती' (Lok Majhe Sangati) पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्यात ही घोषणा केली आणि कार्यकर्त्यांनी एकच गोंधळ घातला. सभागृहात उपस्थित सर्व नेत्यांनी शरद पवारांना निर्णय मागे घेण्याची विनंती केली असताना अजित पवारांनी (Ajit Pawar) मात्र त्यांच्या निर्णयाचं समर्थन केलं आहे. यावेळी त्यांनी गोंधळ घालणाऱ्या कार्यकर्त्यांनाही झापलं. यावेळी त्यांनी सुप्रिया तू बोलू नकोस असा सल्लाही दिला. तसंच मोठा भाऊ या अधिकारवाणीने सांगत गोंधळ घालणाऱ्याला गप्प केलं. 

अजित पवार काय म्हणाले ?

"सगळ्यांच्या भावना शरद पवारांनी पाहिल्या आहेत. शरद पवार अध्यक्ष नाहीत म्हणजे पक्षात नाही असं नाही. आज काँग्रेसमध्ये खर्गे अध्यक्ष असताना सोनिया गांधी यांच्याकडे पाहत पक्ष वाटचाल करत आहेत. शरद पवारांच्या वयाचा विचार करता एका नव्या नेतृत्वाकडे आपण जबाबदारी देण्याचा विचार करत आहोत. शरद पवारांच्या मार्गदर्शनाखाली पक्षाचं काम करेल. साहेब म्हणजेच पक्ष आहेत हे कोणी येड्या गबाळ्याने सांगण्याची गरज नाही," असं अजित पवारांनी सांगितलं. 

"शरद पवारांनी निर्णय घेतला आहे. ते नेहमी जनतेचं ऐकत असतात. शरद पवार यापुढेही आपल्याला वेळोवेळी मार्गदर्शन करणार आहेत. उद्या जर कोणी अध्यक्ष झालं तर तोही शरद पवारांच्या मार्गदर्शनात काम करणार आहे. अल्पसंख्यांक समाजाला जर शरद पवार अध्यक्ष राहिले तरच पाठीशी उभे राहतील असं का वाटत आहे. ते त्यांच्या रक्तात नाही. शरद पवार अध्यक्ष असो किंवा नसो, आपला परिवार असाच पुढे कायम राहणार आहे. भावनिक होऊ नका. शरद पवारांनीच भाकरी फिरवायची असते असं सांगितलं आहे. ते निर्णय मागे घेणार नाहीत अशी त्यांची भूमिका आहे. काकींशी बोललो असता त्यांनीही तेच सांगितलं आहे," असं अजित पवारांनी सांगितलं. 

"आम्हाला आता पर्याय नाही असं सांगत भावनिक होऊ नका. इतर कोणता पर्याय आपल्याकडे आहे. तुम्हाला कळत नाही का? साहेबांच्या मार्गदर्शनाखाली येणाऱ्या नव्या अध्यक्षाला आपण साथ देऊ. अध्यक्ष नवनवीन गोष्टी शिकेल. आपण ज्याप्रमाणे घरात नवीन व्यक्तीला संधी देतो. शिकवतो तसं होईल ना. तुम्ही कशाला काळजी करत आहात. कोणीही अध्यक्ष झालं तरी साहेबांच्या जीवावरच राष्ट्रवादी पक्ष चालणार आहे हे सांगायला ज्योतिषाची गरज नाही," असं अजित पवार म्हणाले. 

"शरद पवार निर्णय घेताना प्रमुखांना बसवून चर्चा करायचे. पण यावेळी त्यांनी घोषणा करत सर्वांना धक्का दिला. शरद पवार परिवाराचे प्रमुख म्हणूनच काम करणार आहेत. त्याबद्दल शंका असण्याची गरज नाही. उगाच तेच तेच सांगू नका. पण काळानुरुप काही निर्णय घ्यावे लागतात. आता साहेबांच्या डोळ्यादेखत नवीन अध्यक्ष झाला तर तुम्हाला का नको रे? मला तुमचं काय कळत नाही. साहेब राजकारणीतल बारकावे त्याला समजावून सांगतील," असं अजित पवारांनी खडसावलं. 

शरद पवारांचा अनुभव लक्षात घेता त्यांच्याशी चर्चा करुनच पुढील निर्णय घेतले जातील. हा प्रसंग कधीतरी येणार होता. 1 मे रोजी ते जाहीर करणार होते. पण वज्रमूठ सभा असल्याने त्यांनी जाहीर केलं नव्हतं. त्यानुसार आज त्यांनी घोषणा केली आहे. त्यामुळे साहेबांच्या मनात आहे त्याप्रमाणे आपण करु अशी विनंती असल्याचं अजित पवारांनी सांगितलं.