close

बातमी थेट मेलबॉक्सलाकाही निवडक बातम्या थेट तुमच्या ईमेल बॉक्सला…

राष्ट्रवादीचे भास्कर जाधव यांचा निर्णय झाला, स्वगृही परतणार !

राष्ट्रवादीचे आमदार भास्कर जाधव शिवसेनेत प्रवेश करणार असल्याचे जवळपास निश्चित झाले आहे. 

Updated: Aug 30, 2019, 04:25 PM IST
राष्ट्रवादीचे भास्कर जाधव यांचा निर्णय झाला, स्वगृही परतणार !

रत्नागिरी : राष्ट्रवादीचे गुहागरचे विद्यमान आमदार भास्कर जाधव शिवसेनेत प्रवेश करणार असल्याचे जवळपास निश्चित झाले आहे. येत्या दोन दिवसांत ते स्वगृही परततील, असे बोलले जात आहे.  त्यांनी आज मतदारसंघातल्या पक्षाच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली. यावेळी येत्या दोन दिवसांत आपण पक्षांतर करणार असल्याचे सांगितले. त्याचवेळी त्यांनी आपण भाजपमध्ये जाणार नसल्याचंही त्यांनी स्पष्ट केले. त्यामुळे त्यांनी शिवसेनेत प्रवेश करणार असल्याचे संकेत दिले आहेत. 

दरम्यान, भास्कर जाधव यांनी काही दिवसांपूर्वी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतली होती. त्यानंतर त्यांच्या शिवसेना प्रवेशाची जोरदार चर्चा सुरु झाली होती. ही चर्चा रंगत असताना जाधव यांनी पत्रकार परिषद घेत हो, मी उद्धव ठाकरे यांनी भेटलो. माझी १५ वर्षांनंतर भेट झाली आणि सविस्तर चर्चा केल्याचे जाहीर केले. त्यामुळे ते शिवसेनेत जाणार अशी चर्चा होती. आज त्यांनी आपली अधिकृत भूमिका जाहीर केली आहे.

माझ्याबरोबर जे येतील त्यांना सोबत घेऊन जाऊ, पण जे येणार नाहीत त्यांच्याबाबत काही नाराजी नसेल असेही जाधव यांनी म्हटले आहे. जाधव यांच्या या निर्णयामुळे गुहागरचे अनेक कार्यकर्ते नाराज झाले आहेत.